पुणे : पुण्यातील मनसेच्या माथाडी कामगार सेनेच्या माजी शहराध्यक्षांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. निलेश माझीरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे. माझीरे हे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. वसंत मोरे पक्षात साईडलाईन झाल्यानंतर मनसेला हा पुण्यातील मोठा धक्का मानला जात आहे.
मी आज पक्ष सोडण्याचे मुख्य कारण म्हणजे मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि राज्य सरचिटणीस बाबू वागस्कर तसेच कोअर कमिटीतील इतर सदस्य आहेत असं सांगत माझिरे यांनी पक्ष सोडत असल्याचं जाहीर केलं आहे.
१९ मे रोजी मी मनसे सोडणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांत आल्या होत्याय त्यानंतर माझिरे यांची हकालपट्टी करा असं साईनाथ बाबर म्हणाले होते. तर बाबू वागस्कर यांनी तू पक्षात राहणार आहेस का? अशी विचारणा केली होती. मला बोलावून घेऊन विचारता तुम्ही पक्षात राहणार आहात का? असं म्हणत हुकूमशाहीच सुरु असल्याचा आरोप माझीरे यांनी केलाय.
पुणे मनसेत गेल्या काही दिवसापासून अंतर्गत वाद सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून मनसेत कुरबुरी असल्याच्या चर्चा समोर येतच असतात. त्यातच आता अजून एक भर पडली आहे. निलेश माझिरे यांनी पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून आणि वादामुळे पक्षाला रामराम ठोकला आहे.