मुंबई : तब्बल दोन तासांच्या विलंबाने विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आता पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर आणि भाजपच्या उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातील एक मत बाद ठरवण्यात आले आहे. ही दोन्ही मते बाद करण्यावरुन भाजप आणि महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींमध्ये खडाजंगी झाली.
या दोन्ही मतपत्रिकांद्वारे रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांना पहिल्या पसंतीचे मत देण्यात आले होते. मात्र, रामराजेंच्या मतपत्रिकेवर खाडाखोड असल्याने त्यावर भाजपचे पोलिंग एजंट असलेल्या आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला होता. ही मतपत्रिका बाद ठरवण्यात यावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींना याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता मतमोजणीच्या ठिकाणी भाजप आणि महाविकास आघाडीत वाद रंगला आहे.