मुंबई (प्रतिनिधी) : ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याच्या वेळी खारघर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांची एक सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. एका महिन्याच्या आत ही समिती सरकारला आपला अहवाल सादर करेल. भविष्यातील अशा प्रकारच्या शासकीय समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी, दक्षता घ्यावी, या बाबतही करीर समिती शासनास शिफारशी करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी न्यायालयीन चौकशीची तर काँग्रेसने विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.
ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य शासनाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने नुकतेच खारघर येथील एका कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमास उपस्थित होते मात्र या कार्यक्रमादरम्यान १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. या घटनेमुळे कार्यक्रमाला गालबोट लागले. गर्दीचे योग्य नियोजन न केल्यामुळे रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहोचण्यात अक्षम्य विलंब झाल्यामुळे वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. त्या वेळी काही प्रमाणात चेंगराचेंगरी झाल्याचीही व्हीडीओ समोर आले आहेत.
खारघर घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले. ही घटना नैसर्गिक नसून शासननिर्मित आहे. सदोष नियोजनामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेला आणि मूत्यूला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे. त्यामुळे शासनावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळाचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवून चर्चा घडवावी अशी मागणी केली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने नितीन करीर यांची समिती नियुक्त केली आहे. एका महिन्यात ही समिती आपला अहवाल शासनाकडे सादर करेल.
राजकारणासाठी श्री सदस्यांचे बळी गेले
१४ श्री सदस्यांचा मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे खारघर दुर्घटनेच्या ठिकाणी का गेले नाही? आता कुठे आहेत ते? तर या प्रकरणी जर का कोणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली असेल तर त्यामध्ये चुकीचे काय आहे आणि मागणी करण्यापेक्षा त्यांनी स्वत: या प्रकरणाची जवाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
असा कार्यक्रम पहिल्यांदाच झाला असे नाही. या आधीदेखील आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी कार्यक्रम झालेला आहे. त्या वेळी तर सर्व काही नीट झाले होते. इतका भव्य-दिव्य कार्यक्रम आयोजित करायचाच होता तर त्याचे तसे नियोजन करणेदेखील गरजेचे होते असेही या वेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.