मुंबई : शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थ नियंत्रण विभागाने काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर काल आर्यन खानला एनसीबीनेच क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे त्यावेळी आर्यन खान प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात निष्काळजीपणे तपास केल्याप्रकरणी कारवाई होणार असल्याची माहिती आहे. याबद्दल आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे.
नाना पटोले यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्य, हनुमान चालिसा, प्रियंका गांधींची राज्यसभेची उमेदवारी अशा अनेक मुद्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. आर्यन खान आणि समीर वानखेडे प्रकरणाबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले, काँग्रेसने याआधीही आपली भूमिका मांडलेली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सध्या सुरू आहे. समीर वानखेडे हा केंद्रीय यंत्रणांचा पोपट आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. यापुढेही कधी त्याच्यावर कारवाई होणार नाही.
धर्म हा आस्थेचा विषय
हनुमान चालिसावरून राज्यात चाललेल्या वादावर नाना पटोले म्हणतात, मी घरून हनुमान चालिसा वाचूनच निघतो. ही माझी आस्था आहे. आमचा धर्म आम्हाला हे शिकवतो. आमच्याकडे श्रावणातल्या शनिवारी मोठं हनुमान चालिसा पठण होतं. त्याची जाहिरात कधी केली नाही मी.