मुंबई: वाढत्या प्रदुषणाबरोबरच कोरोना विषाणूचा संसर्गही वाढतो असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे मी फटाके बंदी लागू करणार नाही; मात्र नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी फटाक्यांबाबत संयम बाळगावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील जनतेशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले की,‘पाश्चिमात्य देशांत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, आपल्या राज्यात पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये यासाठी आतापासूनच काळजी घेण्याची गरज आहे.’राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली आहे.
ठाकरे पुढे म्हणाले, की ‘राज्यात कोरोना संसर्गाचा वेग आता कमी होत आहे. पण, दिवाळीच्या काळात पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे. यामुळं दिवाळीत फटाक्यांचा वापर न करण्याचा संकल्प करा, दिवे जरुर पेटवा, फराळ करा पण, फटाके न वाजवता सण साजरा करा. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. सर्व समाजबांधवांनी सण घरात राहून साजरे केले. त्याबद्दल सर्वांचे आभार. ’
प्रदुषणामुळे विषाणू संसर्ग वाढ
‘मला फटाक्यांवर बंदी घालायची नाहीये. पण आत्तापर्यंत तुम्ही जसे सगळे पाळले तसेच या पुढेही सहकार्य करावे. जर प्रदुषणामुळे हा विषाणू वाढत असेल तर दिवाळीत प्रदुषण करणारे फटाके टाळू शकतो का? यावर विचार करावा. तुम्ही मर्यादित स्वरुपात फटाके वाजवू शकता. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यावर बंदी आहे. दिवाळीचे व दिवाळी नंतरचे पुढचे १५ दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. थंडी सुरू होतेय, विषाणू पुन्हा वाढतोय, त्यामुळे ही थोडी खबरदारी घेण्याची गरज आहे’, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
‘ते’ मुंबईच्या विकासात मिठाचा खडा टाकत आहेत
राज्य सरकारने मेट्रोच्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जमिनीची निवड केली. ही जमीन मिठागाराची असून ती केंद्राच्या मालकीची असल्याचा दावा आता अनेकजण करीत आहेत. मात्र, कांजूरमार्गची जमीन मिठागाराची आहे, हे सांगणा-यांना आपण मुंबईकरांच्या विकासाच्या मार्गात मिठाचा खडा टाकतोय, याची जाणीव नाही का, असा अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला
मंदीरांबाबत लवकरच निर्णय
राज्यातील मंदिरे का खुली करत नाहीत? याचे कारणही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून प्रार्थनास्थळे बंदे आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मंदिरे उघडण्याची मागणीही जोर धरु लागली. ‘मंदिरं कधी उघडणार असे मला गेल्या महिन्यांपासून विचारले जात आहे. मंदिरे उघडणारच आहोत. पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे. त्यानंतर नियमावली तयार करु मगच मंदिरे उघडली जातील, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. घरातील आजी- आजोबा मंदिरात जात असतात. कोरोनाच्या संकटामुळे त्यांना आपण आतापर्यंत जपत आलो आहोत. त्यांच्या काळजीपोटी धार्मिस्थळे उघडण्यात थोडा उशीर होत आहे. पण तरीही माझ्यावर टीका होतेय. पण महाराष्ट्रासाठी माझ्यावर टीका झाली तरी मला चालेल. हा वाईटपणा घ्यायला मी तयार आहे,’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ‘धार्मिकस्थळे उघडण्याची नियमावली सोपी आहे. मंदिरात जातानाही तोंडाला मास्क लावून जायचे आणि मंदिरात कमीत कमी गर्दी करायची, हीच नियमावली असणार आहे. मात्र, याबाबत घाई करून चालणार नाही,’असेही त्यांनी सांगितले.