ठाणे : जूनपासून मिशन बिगेन अगेन सुरू झाले आहे. त्यानुसार इतर सर्वांनी जगभरात ज्या काही गोष्टी घाईगडबडीत केल्या असतील, त्या गोष्टी महाराष्ट्र करणार नाही. आपण ज्या-ज्या गोष्टी सुरू केल्या, त्या पुन्हा बंद होणार नाहीत, याची दक्षता घेऊन आपण या गोष्टी सुरू केल्या. शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, त्या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी उघडायला परवानगी दिली आहे. पण ज्या गोष्टी सध्या शक्य नाही किंवा त्या उघडण्याची खात्री होत नाही, तोपर्यंत त्या सुरू केल्या जाणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
कोरोनाची मुंबईतील स्थिती नियंत्रणात आली असली तरी पुणे व ठाणे जिल्ह्यातील स्थिती अजूनही नियंत्रणात नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ठाण्याचा दौरा करून तेथील स्थितीचा आढावा घेतला. ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. बैठकीला नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजयकुमार, मुख्यमंत्री महोदयांचे सल्लागार अजोय मेहता, आरोग्य प्रधान सचिव, डॉ. प्रदीप व्यास, खा. श्रीकांत शिंदे, आ. संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक यांसह सर्व मनपा आयुक्त, पोलिस अधिकारी, जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोनाचे संकट अजून टळलेले नसल्याची जाणीव करून दिली. कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते, हा जगभरातील अनुभव आहे. त्यावरून ठाणेकरांनी गाफील राहून चालणार नाही, असे म्हटले.
लॉकडाऊननंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली आहे. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु हे करत असताना आपल्याला कायम सतर्क राहावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना बरा झाल्यानंतर रुग्णांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर असतो हे लक्षात ठेवून रुग्णांवर उपचार करावे. तसेच कोराना रुग्णावर उपचार करताना काळजी घेण्याची गरज आहे. अनावश्यक औषधोपचार टाळण्यावर भर देण्यात यावा. कोरोना बरा झालेल्या रुग्णांशी यंत्रणांनी एक महिना संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
दुस-या लाटेचा धोका, गाफिल राहायला नको
मुंबई महानगर क्षेत्रात (मुंबई बाहेर) कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, त्यासाठी तयारीत राहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ठाणे येथील आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत कोरोना नियंत्रणासाठी वापरण्यात आलेला मुंब्रा-धारावी पॅटर्न इतर शहरात वापरण्याविषयी चर्चा झाली. यावेळी या भागात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, असा चर्चेचा एकूण सूर निघाला.
कोरोना लसबद्दल तिस-या टप्प्यातील कार्यक्षमता चाचणीनंतरच खात्री शक्य