पुणे : भारतीय जनता पक्ष(भाजप)चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. अशातच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशासंदर्भात प्रश्न विचारला असता, खडसे यांचा प्रवेशासंदर्भात माहिती नसल्याचे पवार म्हणाले़
शुक्रवार दि़ १६ ऑक्टोबर रोजी अजित पवार यांनी पुण्यात कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
भाजपचे नेते एकनाथ खडसे हे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा आहे, तुमचीही आधी भेट झाली होती, असा सवाल विचारला असता, अजित पवारांनी आपल्या स्टाइलने उत्तर दिले. राजकीय जीवनात वावरत असताना अनेक नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात. अनेक जण कामानिमित्ताने भेटत असतात. त्याच दरम्यान, त्यांची आणि माझी भेट झाली होती. आता आमची भेट झाली म्हणून त्यातून कोणताही अर्थ काढू नये. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत की, याबद्दल माझ्याकडे माहिती नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
जलयुक्त शिवार सुडबुध्दीने केलेली कारवाई नाही
जलयुक्त शिवार योजनेची चौकशी कॅगच्या अहवालानुसारच करण्यात येत आहे. राज्य सरकारने सुडबुद्धीने कारवाई केली नाही. त्यामुळे विरोधकांनी यामध्ये कोणतेही राजकारण आणू नये. सरकार कुणाचेही असताना चुका होऊ शकतात, असंही अजित पवार म्हणाले.
अवैध धंद्यांना तालुक्यात कुठेही थारा दिला जाणार नाही:पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते