23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeमहाराष्ट्रकोणत्याही पक्षाच्या हाती उज्ज्वल भवितव्य नाही

कोणत्याही पक्षाच्या हाती उज्ज्वल भवितव्य नाही

एकमत ऑनलाईन

नगर : लोकायुक्तांच्या मुद्यावर राज्यातील ठाकरे सरकार पाडण्याचा इशारा दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता देशपातळीवर संघटना बांधणीचे काम सुरू केले आहे. देशातील १४ राज्यांतून आलेल्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर राळेगणसिद्धीमध्ये झाले. यावेळी अण्णांनी ‘कोणत्याही पक्षाच्या हाती देशाचे उज्ज्वल भवितव्य नाही. अशा परिस्थितीत जनसंसद मजबूत झाली पाहिजे. यातून लोक जागे झाले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकारही पाडले जाऊ शकते, असे म्हणत अण्णा हजारे यांनी दीर्घकालीन नियोजन करून कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.

गेल्या आठवड्यात अण्णा हजारे यांनी राज्यातील लोकायुक्त कायदा सक्षम करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारला ३ महिन्यांची मुदत दिली आहे अन्यथा जानेवारीपासून आंदोलनचा इशारा देताना एक तर कायदा होईल, किंवा ठाकरे सरकार पडेल, असा निर्वाणीचा इशारा दिला. या घडामोडी सुरू असतानाच राळेगणसिद्धीमध्ये राष्ट्रीय कार्यकर्ता शिबिर झाले. यामध्ये हजारे यांनी देशव्यापी मुद्यांना हात घातला. जगदीश प्रसाद सोलंकी (दिल्ली), रामपाल जाट (राजस्थान), भोपलसिंग चौधरी (उत्तराखंड), कल्पना इनामदार (मुंबई), योगेंद्र पारीख (राजस्थान), अशोक सब्बन (महाराष्ट्र), दशरथभाई (राजस्थान) असे प्रमुख कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते. सुमारे ८६ कार्यकर्त्यांनी या शिबिरात सहभाग घेतला.

यावेळी अण्णा म्हणाले की, ब्रिटिशांच्या काळात बाहेरचे लोक देशाला लुटत होते. आता आपल्याच लोकांचे सरकार असूनही लुटालूट सुरूच आहे. सर्वच पक्षांचे लोक केवळ सत्ता आणि पैशात गुरफटून गेले आहेत. प्रत्येक सरकार स्वातंत्र्याचा अर्थ जर स्वैराचार असा घेऊन वागत असेल, तर जनसंसद एवढी बुलंद झाली पाहिजे की सरकार पाडता आले पाहिजे. सध्या तरी देशाला वाचवण्याचा तेवढाच पर्याय दिसत आहे. देशाला वाचवायचं असेल तर सरकार कोणत्याही पक्षाचे असो, त्यांच्यावर अंकुश असणारी जनसंसद ताकदवान करण्याची गरज आहे.

समाज आणि देशासाठी आयुष्य देणे हे माझे काम
आपल्यावर होणा-या टीकेबद्दल ते म्हणाले, ‘काही लोक माझ्यावर जाणीवपूर्वक टीका करतात. मात्र, आपण त्याकडे लक्ष देत नाही. ते माझे कामही नाही. समाज आणि देशासाठी आयुष्य देणे हे माझे काम आहे. सत्य कधीच पराभूत होत नाही, यावर माझा विश्वास आहे. मला कोणत्याही राजकीय पक्षाशी काहीही देणेघेणे नाही. फक्त समाज आणि देशाच्या बाजूने आपण लढत राहू, असे अण्णा म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या