कोल्हापूर : आषाढ महिना संपून परवापासून श्रावण सुरू होतो आहे. श्रावणात मांसाहार वर्ज्य असल्याने आषाढाच्या अखेरच्या दिवशी कोल्हापूरकरांनी चिकन-मटणावर ताव मारण्याचा बेत आखला असून त्यासाठी नॉनव्हेजप्रेमींनी सकाळपासूनच कोल्हापुरातील मटण मार्केटमधील दुकानाच्या बाहेर रांगा लावल्या आहेत. चिकन-मटणाबरोबरच मासे आणि खेकड्यांना देखील कोल्हापूरकर खवय्यांची पसंती मिळत आहे.
बुधवारी मागणी वाढल्याने चिकन-मटणाच्या दरात दहा ते वीस रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. तरी कोल्हापूरकर खवय्ये मात्र तांबडा-पांढरावर ताव मारण्याच्याच मूडमध्ये आहेत. वर्षभर मांसाहार करणारे बरेच जण श्रावण आणि नवरात्रीत मांसाहार टाळतात. महिनाभर मांसाहार करायला मिळणार नाही म्हणून आता शेवटच्या दिवशी अनेक जण चिकन- मटणावर ताव मारणार आहेत.
सध्या उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरू आहे. मराठी लोकांचा श्रावण महिना २९ जुलैपासून सुरू होईल. हिंदू धर्मीयांमध्ये हा महिना अत्यंत पवित्र मानण्यात येतो. या काळात मांसाहार वर्ज्य करून सात्विक भोजनाकडे अनेकांचा कल असतो.
ब-याच ठिकाणी श्रावण महिन्यात चिकन-मटणाची दुकानेसुद्धा बंद असतात तर या काळात विक्रीअभावी अनेकांचे व्यवसाय मंदावतात. सध्या श्रावण सुरू होण्याआधी मटणविक्रेते दरात वाढ करून हा तोटा भरून काढत आहेत.