ही श्रेय घेण्याची लढाई नाही, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारला असून राज्यातील निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला. आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसी समाजाला न्याय मिळाला याचे समाधान आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, ही श्रेय घेण्याची लढाई अजिबात नाही, कारण सर्वसामान्य जनतेच्या, विशेषत: दुर्बल समाजाच्या भल्यासाठी काम करणे हे कुठल्याही सरकारचे कर्तव्यच असते आणि म्हणूनच ओबीसी आरक्षणासाठी अगदी पहिल्यापासून महाविकास आघाडीतले आम्ही सर्व पक्ष मनापासून प्रयत्न करीत होतो. हा तिढा अवघड होता. पण तो सोडविण्यासाठी आम्ही त्यावेळेस विरोधी पक्ष, संघटना या सर्वांशी वारंवार चर्चा करून त्यांनाही विश्वासात घेतले होते. जयंत बांठिया यांच्यासारखा अनुभवी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांची टीम यांनी हे शिवधनुष्य पेलले. त्याबद्दल त्यांनाही जितके धन्यवाद द्यावे तितके कमीच आहेत, असे ठाकरे म्हणाले.
मी आज मुख्यमंत्री नसलो तरी…
याबाबत आयोगाचे सर्व सदस्य अतिशय मेहनतीने काम करीत होतेच. शिवाय राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेतील सर्व घटकांनीदेखील सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यामुळे महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांना यश आले, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मी आज मुख्यमंत्री नसलो तरी आमच्या काळात यावर सर्वानुमते जी पावले उचलली होती, त्याला यश मिळाले, यासारखे समाधान नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आघाडी सरकारच्या प्रयत्नाचे यश : पवार
ओबीसी समाजाच्या हक्कासाठी सुरू असलेली न्यायालयीन लढाई महाराष्ट्राने आज जिंकली, याचे समाधान वाटते. हे आरक्षण टिकावे यासाठी छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्वाने प्रामाणिक प्रयत्न केले. आज त्याची परिणती निर्णयात दिसली, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.