22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रशेवाळेंच्या नियुक्तीवर आक्षेप; विनायक राऊत सुप्रीम कोर्टात जाणार

शेवाळेंच्या नियुक्तीवर आक्षेप; विनायक राऊत सुप्रीम कोर्टात जाणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे समर्थक खासदार गटाला आणि राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे. मात्र, शिवसेना नेते विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आक्षेप घेत आम्ही तीन पत्र पाठवूनही एकतर्फी निर्णय घेण्यात आला आहे, असा आरोप करण्यात आला.

विनायक राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. १८ जुलैला रात्री साडेआठ वाजता गटनेतेपदी कोणी क्लेम केला तर आम्हाला आमचे म्हणणे मांडण्यासाठी संधी द्या, अशा पद्धतीची संधी पत्र देत केली. त्यानंतर २२ जुलैला त्यासंदर्भात भेटून पत्र दिले. मात्र, अचानक लोकसभा पोर्टलवर जे पत्र वाचलं तेव्हा यामध्ये अध्यक्षांनी पत्राची दखल घेतली नसल्याचे समजले.
आमची बाजू न ऐकता गटनेतेपदाला मान्यता देण्यात आली.

आमच्या पत्राची दखल घेतली नाही. त्यांना बंडखोर गटाचा फ्लोअर लीडर बनवायचा होता तर ज्या दिवशी त्यांनी पत्र दिलं त्यादिवशीपासून अंमलबजावणी व्हायला हवी होती. परंतु त्यांनी पत्र दिले १९ तारखेला आणि १८ तारखेला अंमलबजावणी झाली. त्यामुळे, पक्षपातीपणे निर्णय झाल्याची आम्हाला शंका आहे. त्यासंदर्भात अध्यक्षांची भेट घेणार आहे. त्यांना लेखी विचारणा करणार असल्याचे राऊतांनी यावेळी म्हटले आहे.

खरंतर गटनेतेपदी निवड करण्याचा अधिकार त्या त्या पक्षप्रमुखांना असतो. त्यामुळे आम्ही जे त्यांना पत्र दिलं होतं त्याची दखल घेणे गरजेचे होते. परंतु आमच्या पत्राला कोणतही उत्तर न देता एकतर्फी निर्णय घेण्यात आला. शिवसेनेवर लोकसभा कार्यालयाने अन्याय केला आहे. असा आरोप करत आणि यासंदर्भात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचेही राऊत यांनी यावेळी सांगितले.

तसेच, आजतरी शिवसेना पक्ष गटनेता मीच आहे. त्यामुळे याबाबतची कायदेशीर लढाई आम्ही करणार आहोत. सर्वोच्च न्यायालयात लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आम्ही आवाहन नक्की देणार, असेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या