27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रराज्याच्या सत्तासंघर्षावर २० जुलै रोजी सुनावणी

राज्याच्या सत्तासंघर्षावर २० जुलै रोजी सुनावणी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : शिवसेनेतील बंडखोरीचा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. याबाबत मोठा निर्णय झाला असून शिवसेनेतील बंडखोरीबाबत सर्वोच्च न्यायालयातील सर्व याचिकांवर २० जुलै रोजी सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे ही सुनावणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यावर काय निरीक्षणे नोंदवते आणि काय निकाल देते, याकडे राज्यातील सर्वांचेच लक्ष असणार आहे.

या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय शिवसेनेतील बंडखोरीपासून राज्यातील सत्तांतर आणि विधानसभेतील बदलांची कायदेशीर वैधता यावरही सुनावणी घेईल. तीन सदस्यीय सर्वोच्च न्यायालयाच्या या खंडपीठात सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्यासह न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश असणार आहे. शिवसेनेने १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याची नोटीस बजावली होती. विधानसभा उपाध्यक्षांच्या या नोटिशीला बंडखोर गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.

यासह शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिका, उपसभापतींनी सुरू केलेल्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका, उपसभापतींना कारवाई करण्यापासून रोखण्याची मागणी करणारी भरत गोगावलेंसह १४ शिवसेना आमदारांनी दाखल केलेली याचिका, उपसभापतींच्या हकालपट्टीचा निर्णय होईपर्यंत अपात्रतेची याचिका या सर्व याचिकांवर सुनावणी होणार आहे.

२७ जून रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने बंडखोर आमदारांना उपसभापतींच्या अपात्रतेच्या नोटिशीला लेखी उत्तरे दाखल करण्यासाठी १२ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निर्देशाला आव्हान देणारी याचिका शिवसेनेचे मुख्य व्हीप सुनील प्रभू (उद्धव ठाकरे गटाशी संबंधित) यांनी दाखल केली होती. मात्र, २९ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने फ्लोअर टेस्ट थांबवण्यास नकार दिला होता.

न्यायालयाच्या आदेशानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, या आव्हान याचिकांची सुनावणी प्रलंबित होती. आता त्यावर २० जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या