22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रअतिवृष्टीग्रस्त वा-यावर!

अतिवृष्टीग्रस्त वा-यावर!

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्­या अधिवेशनातच तब्­बल २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्­या. पुरवणी मागण्यांत कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांना ५० हजार रूपये अनुदान देण्यासाठी ४ हजार ७०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अतिवृष्­टी व पूरग्रस्­तांच्या मदतीसाठी मात्र कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही. स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्­सव साजरा करण्यासाठी ५०० कोटींची, तर मराठवाडा मुक्­ती संग्रामाच्या अमृत महोत्­सवी वर्षासाठी ७५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, अतिवृष्टीत शेतक-यांचे अतोनात नुकसान होऊनही पुरवणी मागण्यांत त्यांच्या मदतीची तरतूद केलेली नाही. त्यामुळे आपद्ग्रस्त शेतक-यांना वा-यावर सोडल्याची भावना व्यक्त होत आहे.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली. नुकसानग्रस्त शेतक-यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपये मदत देणार असल्याचे जाहीरही केले. मात्र, आज विधिमंडळात सादर केलेल्या पुरवणी मागणीत याची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतक-यांना कधी मदत मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. अनेक गाव-खेड्यांमध्ये पूरस्थिती उद्भवली असून खेड्यापाड्यांचा संपर्क तुटला आहे. आजही अनेक भागांत पूरस्थिती कायम असून, मुसळधार पावसाने पिके भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे राज्यात लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जुलैमधील पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास १५ लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. प्राथमिक अहवालातून ही माहिती समोर आली असली, तरी राज्यात सर्वत्र अतिपाऊस झाल्याने बहुतांश पिके आजही पाण्याखाली असून, ती नासून गेली आहेत. यात सोयाबीन, कापूस, धान आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले.

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला आहे. तेथील २ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, फळपिकांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांतही चांगलेच नुकसान झाले आहे. विदर्भातही जवळपास अडीच लाख हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. वर्धा, नागपूर, गडचिरोलीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानाचे पंचनामे कधी होणार, मायबाप सरकार मदत कधी करणार, असा सवाल शेतक-यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील राज्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून राज्यातील शेतक-यांना तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.

राज्यात १५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान
राज्यात अतिवृष्टीमुळे १५ लाख हेक्टरील शेतीचे नुकसान झाले आहे. त्यासाठी शेतक-यांच्या मागणीनुसार त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन हेक्टरची मर्यादा वाढवून ती ३ हेक्टर केली आहे. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे ६ हजार ८०० रुपयांची मदत मिळत होती. त्यापेक्षा दुप्पट मदत देणार असल्याची घोषणाही करण्यात आलेली आहे.

पुरवणी मागणीत उल्लेखच नाही
भाजपकडील खाती
– गृह खाते १५९३ कोटी
– सहकार ५१४५ कोटी
– महिला बालकल्याण १६७२ कोटी
– बहुजन कल्याण २९५ कोटी
– वैद्यकीय शिक्षण २३५ कोटी
– पर्यटन ५५१ कोटी
– नियोजन ५०० कोटी
– ग्रामविकास १३०१ कोटी
– अन्न नागरी पुरवठा ५०८ कोटी

> शिंदे गटाकडे असणारी खाती
– नगरविकास खाते ८८६ कोटी
– स्थानिक स्वराज्य संस्था ८४० कोटी
– नागरी सुविधा ५०० कोटी
– आरोग्य २२३७ कोटी
-१४६२ कोटी केंद्राच्या योजनेतील राज्याचा हिस्सा
-१४६ कोटी रुग्णवाहिका खरेदी
– २३२ कोटी महात्मा ज्योतिबा फुले योजना
> >  आणीबाणीमधील तुरुंगवास झालेल्यांना पेन्शन योजना ११९ कोटी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या