मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला
मुंबई : कोरोना काळात राज्यात मंदिरे आणि प्रार्थना स्थळे बंद होती. त्यावेळी रुग्णवाहिकांचे भोंगे वाजत होते. परंतु आता वेगळेच भोंगे वाजत आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप, मनसे आणि राणा दाम्पत्यावर निशाणा साधला.
मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी लिहिलेल्या कोविड वॉरियर या पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाकाळात केलेल्या उपयायोजनांवर टीका करणा-या व्यक्तींना कोविड वॉरियर पुस्तकांच्या प्रती मोफत वाटण्याची गरज आहे. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मजुरांचे स्थलांतर ही एक कटू आठवण आहे. आज सर्व हे चांगले वाटत आहे, पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. मला मुख्यमंत्रीपदाचा आणि जगाला कोविडचा अनुभव नव्हता. तेव्हा काय करावे काहीच कळत नव्हते. कोरोना रुग्णांची अचानक वाढ झाली आणि कोविड भयंकर असल्याचे समोर आले. जर एका टीमला काम दिले, तर त्याचा कॅप्टन मजबूत असायला पाहिजे. कॅप्टन मजबूत नसेल, तर टीम कशी खेळणार. टीमवर माझा विश्वास होता आणि ते काम मी केले. जर मुख्यमंत्रीच गर्भगळीत होऊन बसला असता तर अख्खे राज्य बसले असते, असा दावा त्यांनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, पहिली लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरी लस घ्यायची होती. ते घेईपर्यंत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली. तेव्हा मला दडपण आले होते. २८ दिवसांमध्ये काळ बदलला. गेल्या दोन वर्षांत आम्ही आयुक्तांचा चेहरा विनामास्क पाहिला नव्हता. मधल्या काळात तर आपल्या हालचाली बदलाव्या लागल्या. हसताना अंग हालवून मी हासतोय असे दाखवावे लागत होते. खांदे उडवतोय म्हणजे मी हसतो आहे. नेमके काय बोलायचे या सगळ््या काळावर हा मोठा प्रश्न आहे. जेव्हा हा काळ इतिहासजमा होईल. तेव्हा आपण काय करत होतो. याची डॉक्युमेंटरी केली पाहिजे. आजच या प्रती काही लोकांना घरपोच पाठवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.