नाशिक : नाशिकच्या निफाडमध्ये १९८२ नंतर दुस-यांदा कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शरद जोशी यांनी निफाड तालुक्यातील रुई या गावात पहिली कांदा परिषद आयोजित केली होती. त्यानंतर येत्या ०५ जूनला रुईत कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या कांद्याचे दर हे १ रुपया ते ३ रुपयांपर्यंत आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आहेत. काही ठिकाणी कांदा उत्पादकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कांदा उत्पादक शेतकरी कांदा जनावरांना खाऊ घालत आहे. त्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वी कांदा परिषद आयोजनाबाबत माहिती दिली होती. कांदा उत्पादक शेतक-यांचा आक्रोश राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये रुई या गावात ५ जून २०२२ रोजी भव्य कांदा परिषद आयोजित करण्यात आली आहे.
निफाड हे कांदा उत्पादक शेतक-यांचे केंद्र म्हणून ओळखले जाते. निफाड तालुक्यातील रुई या गावात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र काही वर्षांपूर्वी म्हणजेच १९८२ ला याच गावात कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे शरद जोशी यांनी १९८२ साली या गावात पहिली कांदा परिषद घेतली होती. यावेळी देखील शेतक-यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचावा, कांद्याला अनुदान मिळावा, हमीभाव मिळावा आदी मागण्यांसंदर्भात या परिषदेत विचारमंथन करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा त्याच रुई गावात रयत क्रांती संघटनेच्या वतीने येत्या ५ जून रोजी कांदा परिषद आयोजित करण्यात आली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. कांद्याला अनुदान मिळावे, हमीभाव मिळावा, नाफेडकडून खरेदी करण्यात येणा-या कांद्याला दर वाढवून मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कांदा परिषदे प्रसंगी राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार असून यामध्ये रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांच्यासह भाजप नेते प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर देखील उपस्थित राहणार आहेत.
लासलगावची कांदा बाजारपेठ
नाशिकसह पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी देखील आहेत. एवढेच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात लासलगाव ही आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे ०५ जूनला होणा-या कांदा परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.