नाशिक : या वर्षी नाशिक जिल्यातील कांदा मार्केट मार्च एन्डलाही सुरू ठेवण्याचा निर्णय नाशिकच्या व्यापाऱ्यांनी घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा मार्केट हि दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटी आर्थिक हिशोबामुळे बंद ठेवण्याची प्रथा आहे. मात्र यावर्षी शेवटचे दोन्ही दिवस जिल्ह्यातील कांदा मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय कांदा व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
लासलगाव कांदा बाजारपेठ देशातीलच नव्हे आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. तसेच नाशिक जिल्हा हा सर्वाधिक कांदा उत्पादन घेणारा जिल्हा आहे. मार्च महिन्यात आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे शेवटचे दोन दिवस हे हिशोब तपासणीसाठी राखीव ठेवले जातात.
त्यामुळे त्या दिवशी कांदा लिलाव होत नाही. त्यामुळे सर्वच परिसरातील कांदा मार्केट अखेरचे चार ते पाच दिवस लिलाव बंद ठेवण्यात येतात. मात्र यावर्षी कांदा मार्केट ३० व ३१ मार्च रोजी देखील सुरू राहणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर पडल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून अनेक भागात आंदोलन देखील झाले, तर दुसरीकडे किसान लॉन्ग मार्चने देखील कांदा दरावरून सरकारचे लक्ष वेधले.
यानंतर राज्य शासनाने कांद्याला ३५० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले. त्याचबरोबर या निर्णयाबाबतचा जीआर देखील काढण्यात आला. यानुसार 1 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे बाजारसमितीच्या व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव ३० व ३१ मार्च रोजी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.