मुंबई : सध्या देशात कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतक-यांना आपल्या कांद्यांची उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे सरकारने कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिल्लीत भेट घेणार आहे.
यावेळी कांदा उत्पादक संघटनेकडून त्यांना १ टन कांदाही भेट देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे.
जगात चीननंतर सर्वाधिक कांदा पिकवणारा आपला देश स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. मात्र, कृषिप्रधान अशी ओळख असलेल्या देशामध्ये कांद्याला सतत मातीमोल भाव मिळत असल्याने शेतक-यांचे कोट्यवधीचे आर्थिक नुकसान होत आहे.
ज्या-ज्या वेळेस कांद्याचे थोडेफार दर वाढतात त्यावेळेस कांदा निर्यात बंदी करणे, परदेशी कांदा आयात करणे, साठा मर्यादा घालून देणे, व्यापा-यावर धाडी टाकणे अशा विविध क्लृप्त्या करून केंद्र सरकारकडून कांद्याचे बाजारभाव पाडण्याचे काम केले जात आहे. भाववाढ झाल्यानंतर तात्काळ विविध प्रकारचे निर्बंध घालणारे केंद्र सरकार कांद्याचे भाव कमी झाल्यानंतर मात्र शेतक-यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.