34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात ३ दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा!

राज्यात ३ दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा!

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात सध्या १४ लाख लसींचे डोस शिल्लक आहेत. हा साठा केवळ ३ दिवस पुरेल, एवढा आहे. त्यामुळे दर आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करायला हवा. दरम्यान, महाराष्ट्राला वेळेत लस पुरवठा न झाल्यास ३ दिवसांत लसीकरण बंद पडण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. दोन दिवसांत रोज ६ लाखांवर डोस दिले जाणार आहेत. त्यामुळे लसींचा वाढीव पुरवठा आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत टोपे यांनी लसीकरण, ऑक्सिजन तसेच रेमडेसिवीरच्या वापरासंबंधी काही महत्वाच्या सूचना केल्याची माहितीही त्यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.

राज्यात रोज ३ लाख लसीकरण केले जात असताना केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रोज सहा लाख डोस देण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडून डोस पुरवले जातील, असे सांगितले. आम्ही आता साडेचार लाखांपर्यंत पोहोचलो असून लवकरच सहा लाखांपर्यंत जाऊ. पण आता साडेचार लाखांमध्येच लस नाही म्हणून केंद्रे बंद ठेवण्याची वेळ येण्याचा धोका निर्माण झाला आहे. लोक तिथे येत असून आमच्या आरोग्य कर्मचा-यांना लस नाही, असे सांगण्याची वेळ आली आहे. या सर्व गोष्टीला लसीचा न होणारा पुरवठा कारणीभूत आहे, अशी खंत राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

केंद्र सरकार लस पाठवत नाही, असे नाही. पण वेग कमी आहे. ज्या पद्धतीने आव्हानात्मक बोलले जाते, त्या पद्धतीने केले जात नाही, हे केंद्र सरकारला सांगणे आहे, असे सांगत राजेश टोपे यांनी केली.राज्यात केवळ शनिवारी व रविवारी लॉकडाउन आहे. बाकीच्या दिवशी फक्त निर्बंध आहेत. यामुळे गैरसमज करून घेऊ नये, असेही टोपेंनी सांगितले.

लसीकरणात राज्य आघाडीवर
लसीकरण करणा-या राज्यांत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. लसीकरण मोफत आणि सुरक्षित आहे. पण लस मिळत नाही, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मी केंद्राकडे विनंती केली असून, खासकरून कोव्हॅक्सिन द्या अशी मागणी केली आहे. लस दिली तर मोठा प्रश्न सुटेल, असा विश्वासही राजेश टोपे यांनी व्यक्त केला.

…तर १८ वर्षांवर लस द्यावी
सर्वात जास्त फिरणारे आणि कोरोना होणा-यांमध्ये २० ते ४० वयोगटातील लोक आहेत. या वयोगटाचे इंन्फेक्शन कमी करायचे असेल तर त्या पद्धतीने १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण गरजेचे आहे. इतर ठिकाणी उशीर करा, पण राज्यातील तरुण तरुणींना सुरक्षित करायचे आहे. त्यामुळे लवकर परवानगी देण्याची मागणीही टोपे यांनी केली.

ऑक्सीजनचाही पुरवठा करावा
ऑक्सिजनचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्हाला जवळच्या राज्यातून पुरवठा केला पाहिजे, अशी मागणीही केल्याचे टोपे यांनी सांगितले. तसेच रेमडेसिवीरचा वापर प्रोटोकॉलनुसार करा आणि ११०० ते १४०० च्या वर विकू नये, अशी विनंती त्यांनी केली.

लस तुटवड्याचा आरोप खोटा : हर्षवर्धन
कोरोनावरील लसीच्या तुटवड्याचे महाराष्ट्र सरकारचे आरोप निव्वळ खोटे आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून आपण गेल्या वर्षभरापासून बघत आहोत, महाराष्ट्र सरकार चुकीच्या पद्धतीने काम करत असून कोरोना व्हायरसविरोधी लढाईत प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राची चालढकल सुरू आहे. महाराष्ट्र सरकारच्या या उदासीन भूमिकेमुळे कोरोना व्हायरसविरोधातील लढाईत सुरू असलेल्या प्रयत्नांना धक्का बसत असून देशाची मान खाली गेली आहे, असा गंभीर आरोप हर्षवर्धन यांनी केला.

राजकारण थांबवावे : फडणवीस
यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला सुनावले आहे. लसीकरणाबाबतचे आरोप चुकीचे असून राज्य सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्र्यांनी राजकारण थांबवावे, लोकांच्या जिवाशी खेळू नये, असे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. लसीकरणाबाबतचा आरोप चुकीचा आहे. देशात सर्वात जास्त लस महाराष्ट्राला मिळाली आहे. साठा संपायच्या आत पुढचा साठा येतो, असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या