मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय
मद्रास : मंदिर प्रवेश करण्यासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. मद्रास हायकोर्टाने आपल्या एका निर्णयात म्हटले की, जर इतर कोणत्याही धर्मातील व्यक्तीची हिंदू धर्मातील विशिष्ट देवतेवर श्रद्धा असेल आणि ती व्यक्ती त्या मंदिरात जाऊ इच्छित असेल तर त्याला त्या देवाच्या मंदिरात प्रवेश करण्यास प्रतिबंध किंवा बंदी घालता येणार नाही. अशा प्रकारे प्रतिबंध घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका न्यायालयाने फेटाळली.
न्यायमूर्ती पी. एन. प्रकाश आणि न्यायमूर्ती आर. हेमलता यांच्या खंडपीठाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला. तिरुवत्तर येथील अरुलमिघु आदिकेसव पेरुमल तिरुकोविल येथे कुंबाबीशेगम उत्सवात बिगर हिंदूंना सहभागी होण्यास परवानगी देऊ नये, असे निर्देश देण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती.
सी. सोमण नावाच्या व्यक्तीने संबंधित याचिका दाखल केली होती. कुंबाबीशेगम उत्सवाच्या आयोजनासाठी प्रसिद्ध केलेल्या निमंत्रण पत्रिकेत एका मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख आहे. ते मंत्री ख्रिश्चन असून हाच धागा पकडून इतर धर्मियांना प्रवेश प्रतिबंधित करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती.