नागपूर : अधिवेशनासाठी आलेल्या आमदारांना थर्टी फर्स्ट साजरे करण्याची घाई झालेली आहे. दोन आठवड्यांपासून शेतक-यांच्या प्रश्नावर, विदर्भाच्या मुद्यावर अधिवेशनात चर्चा झालेली नाही. विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी दोन दिवस अधिवेशनाचा कालावधी वाढवा, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. अन्यथा हे अधिवेशन पिकनिक अधिवेशन ठरेल, असे मत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सभागृहाबाहेर व्यक्त केले.
आमचा आरोप आहे की शेतक-यांच्या प्रश्नावर सत्ताधारी आग्रही नाहीत. हरितक्रांतीचे जनक म्हणून वसंतराव नाईकांनी विविध योजना राबविल्या होत्या. हा भाग सुजलाम सुफलाम व्हावा ही नाईकांची अपेक्षा होती. परंतु नागपूर अजूनही मागास आहे. अशात नागपुरात अधिवेशन होते आणि त्यात विदर्भावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे मिटकरी म्हणाले. शुक्रवार अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. सरकार शुक्रवारी पॅकेज घोषणा करणार.
मात्र हे सरकार केवळ घोषणा करते. अंमलबजावणी करीत नाही. देवेंद्र फडणवीसांना आमचा प्रश्न आहे. तुम्ही सत्तेत आल्यावर मुंबईचे का होता. एके वेळी तुम्ही भीष्म प्रतिज्ञा केली होती की, विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही. ते मात्र विदर्भाकडेच दुर्लक्ष करीत आहेत. विदर्भामुळे हे राज्य पोसले जाते. त्यामुळे विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होण्यासाठी दोन दिवस अधिवेशनाचा कालावधी वाढवावा.