24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeमहाराष्ट्रआमचे सरकार अजून भक्कम होतेय

आमचे सरकार अजून भक्कम होतेय

एकमत ऑनलाईन

मुंबई : ईडी, एनआयए आणि एनसीबीसारख्या सर्व यंत्रणांचा वापर महाराष्ट्रातील सरकार व नेत्यांविरुद्ध कटकारस्थान करण्यासाठी केला जातोय; परंतु आमचे नेते घाबरणारे नाहीत उलट सरकार अजून भक्कम होतेय असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या असून यावर नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ज्या पध्दतीने अजित दादांच्या कंपन्यांवर धाडी टाकण्यात येत आहेत त्यावरून स्पष्ट होत आहे की, या राज्यात किंवा जिथे जिथे भाजपविरोधी सरकार निर्माण झाले आहे त्या सरकारला टार्गेट करून बदनाम केले जात आहे. जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये होती तीच परिस्थिती राज्यात निर्माण करण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

आमच्या नेत्यांची बदनामी : जयंत पाटील
राज्यात आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र भाजप करत आहे. भाजपचे पुढारी आमच्या नेत्यांची नावं घेतात आणि त्या पाठोपाठ ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स येते. भाजपने राष्ट्रवादीचा एवढा धसका का घेतलाय..?, असा प्रश्नही जयंत पाटील यांनी केला. आमचा कायद्यावर विश्वास आहे. यापूर्वी छगन भुजबळ यांना असाच त्रास देण्यात आला, त्यांनाही न्याय मिळाला असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

आमचे राष्ट्रवादीचे नेते निर्दोष आहेत, त्यांना बदनाम केले जातेय. धाडसत्र चालवण्याचा या व्यवस्थेचा हेतू आहे. या देशातल्या सर्व एजन्सी भाजप चालवतेय, सरकार चालवत नाही! इन्कम टॅक्स विभागाला माहिती हवी होती तर त्यांनी कारखान्यांना विचारायला हवं होतं. पण धाड घालायची, पहाटेच घालायची ही सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादीवाले बॉलिवूडची भांडी घासायला लागले : निलेश राणे
माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. जो ड्रग्जला समर्थन करतोय आणि ज्या अधिका-यांनी ट्रॅप लावून एक रॅकेट उद्ध्वस्त केले त्यांच्यावर संशय घेतोय. आता राष्ट्रवादीवाले बॉलिवूडची पण भांडी घासायला लागले. काही महिन्यांपूर्वी मलिकचा जावई ड्रग्जमध्ये पकडला गेला होता, अशी खरमरीत टीका निलेश राणे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या