मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलेच फटकारे लगावले आहेत. निवडणूका असो नसो आपल्या पक्षाच्या बैठका या होतच असतात. विरोधी पक्षात असताना लोकांनी शरद पवारांना जास्त प्रेम दिले आहे. सत्तेत असतानाही दिले आहे. आता जे काही १०५ असल्याचे बोलत आहेत, त्यात आपल्या पक्षातून गेलेले आपले ५० आहेत हे लक्षात ठेवा, असे सूचक विधान खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले.
आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. काय करायचं असं जेव्हा साहेबांना विचारते त्यावेळी पवारसाहेब पावसाचे वातावरण थोडे कमी झाल्यावर गाडी बाहेर काढून शेवटच्या युवकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत आहेत, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.
पैसे देऊन जाणारे आहेत. त्याच्यामागे सध्या काय राजकारण सुरू आहे लक्षात आले पाहिजे. मात्र आपण विरोधात असताना आपल्या पक्षाने लीड घ्यावा, असे देशातील लोकांना वाटत आहे, याकडेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. नवाबभाई यांनी दिल्लीला अक्षरश: हलवून सोडलं होतं. मोठा फर्जीवाडा बाहेर काढल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तर दुसरीकडे अनिल देशमुख यांच्यावरही कारवाई झाली. हा एकप्रकारे अन्याय झाला, असं त्या म्हणाल्या.
दादा-पाटील यांनी एकत्र दौरा केला तर बदल होईल
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवारांनी एकत्र दौरा काढला तर राज्यात मोठा बदल होऊ शकतो. त्यामुळे २०२४ मध्ये राष्ट्रवादी हा एक नंबरचा पक्ष होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोर्टाचा निकाल आपल्याच बाजूने लागेल : भुजबळ
यावेळी राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार बॅंिटग केली. बाहेर काय पाऊस.. काय वारा पण सगळे आले बघा.. ओक्केमध्ये आहे, अशी भाषणाची सुरुवात करत छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागेल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.