मुंबई : सध्या राज्यभर विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकांसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यसभा निवडणुका उद्या होणार आहेत तर २० जूनला विधान परिषदेच्या निवडणुका पार पडत आहेत. दरम्यान यासाठी सर्व पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची घोषणा केली जात आहे. राष्ट्रवादीने विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली असून ते आज अर्ज दाखल करणार आहेत.
राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे पक्षांच्या पदाधिका-यांचे एकनाथ खडसे यांनी आभार मानले आहेत. यासंदर्भात ते माध्यमांशी बोलत होते. विधानसभेच्या कालखंडात ज्या घटना घडल्या त्यामुळे मला भाजपातून राष्ट्रवादीमध्ये यावं लागलं असे ते बोलताना म्हणाले. मला भाजपने फक्त गाजर दाखवले. सत्ता माझ्या दृष्टिकोनातून मोठी नाही. पण ज्या प्रकारे मला आधार राष्ट्रवादीने दिला तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझ्या पडत्या काळात माझ्यावर विश्वास दाखवणा-यांसोबत प्रामाणिक राहणं माझं कर्तव्य आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
शरद पवारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली. पण आज महाराष्ट्रातल्या भाजपमध्ये गोपीनाथ मुंडेंचे योगदान मोठे आहे. मुंडे-महाजन-खडसे यांनी भाजप महाराष्ट्रात मोठी केली, पण भाजपने पंकजा मुंडे यांना तिकिट न देणे ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे, खेदजनक आहे, हे पंकजासाठी अन्याय्य आहे. ज्यांचं पक्षासाठी योगदान नाही ते पदावर बसतात हे खूप दुर्दैवी आहे. भाजपने पंकजा यांचा विचार करायला पाहिजे होता, असे मत खडसे यांनी व्यक्त केले आहे.
पंकजा मुंडेंवर अन्याय
राज्यसभेसाठी सध्या घोडेबाजार सुरू आहे. २३ वर्षांमध्ये असे कधी झाले नव्हते. इतकी वर्षे सामंजस्याने प्रश्न सुटत होते पण सध्या पक्ष ज्या भूमिका घेतात ते लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही असे खडसे बोलताना म्हणाले. तसेच राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे आभार मानत भाजपने पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.