नागपूर : आजपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. या पार्श्वभूमिवर नागपूर येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान या अधिवेशनात सुरक्षा बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना जेवण मिळाले नसल्याने हाल होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
नागपूर येते होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी असलेलं जेवण संपल्याने अनेक पोलिसांची उपासमार झाली. सकाळपासून हे पोलिस वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तावर आहेत. दुपारपर्यंत उभं राहूण कर्तव्य बजावणा-या पोलिसांना वेळेवर जेवण मिळालं नाही.
हिवाळी अधिवेशनानिमीत्त राज्यभरातून पोलिस नागपुरात दाखल झाले आहेत. विधानभवन परिसरात तसेच मोर्चा असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच या पोलिसांच्या जेवणाची व्यवस्था खासगी कंत्राटदारामार्फत त्या-त्या जागी करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पोलिस तैनात आहेत त्या ठिकाणी बुफे पध्दतीने जेवण देण्यात येत होते. मात्र वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले जेवण संपल्याने पोलिसांना उपाशी राहावे लागले.
गेल्या अधिवेशनाच्या वेळी देखील हा प्रश्न समोर आला होता, तेव्हा देखील पोलिसांना उपाशी राहावं लागले होते. यावेळी पूर्ण खबरदारी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते, असे असून देखील पोलिसांना गैरसोय सहन करावी लागली. जेवण वेळेवर मिळाले नाही आणि मिळालं ते अपूरं असल्याची तक्रार समोर आली. या नंतर प्रशासनाला जाग आली असून पोलिसांना जेवण मिळावे म्हणून हलचालींना वेग आला.