पुणे : महाराष्ट्रातील राजकारणाचा कुस्तीगीर संघटनेच्या बरखास्तीशी संबंध नाही, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर कुस्तीगीर संघटना बरखास्त करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे, त्यावर शरद पवार आपले मत व्यक्त केले. ते इंदापुरात बोलत होते. ते म्हणाले, की राज्यात अनेक खेळाच्या संस्था आहेत. मी अनेक वर्षापासून अध्यक्ष आहे. मी क्रिकेटचा अध्यक्ष होतो. देशाचा, मुंबईचा आणि जगाचाही होतो. खेळाच्या संघटनेत खेळाच्या निवडीत मी लक्ष घालत नसे. त्या क्षेत्रातील जाणकारांनी काम पाहावे, हे मी करत होतो. त्यांना काही अडचणी आल्या, शासकीय मदतची गरज भासली तर मी मदत करायचो, असे ते म्हणाले.
या सर्व बाबींना कुस्तगीर परिषदही अपवाद नाही. कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी काम करणे, स्पर्धांना आर्थिक मदत देण्याचे काम करणे, आदी गोष्टी करण्यास मी प्राधान्य देत होतो. अलिकडे कुस्तीगीर संघाच्या कामाबद्दल तक्रारी येत होत्या. पुण्यातील संघाच्या तक्रारी गंभीर होत्या. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आणि त्यांच्या सहका-यांना मी बोलून सांगितले होते. मी त्यांना सुधारणा करण्यास सांगितले. ज्यांच्या तक्रारी आल्या, त्यातील पुण्यातील काका पवार राज्यातील हिंद केसरी आहेत. ते आजही अनेक तरुणांना तयार करतात. त्यांच्या तालमीत ८० ते ९० मुले ते तयार करत असतात. आम्ही या तरुणांना मदत करत असतो. राष्ट्रीय पातळीवर यावे म्हणून, असे ते म्हणाले.