मुंबई : विधानपरिषदेच्या १० जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. या मतदानाला भाजपकडून आजारी आमदारांना बोलावण्यावरुन शिवसेनेने टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटलं की, भाजप सर्व मार्गांनी केवळ विजय मिळवण्याचा प्रयत्न करत असून यामध्ये अगदी सरकारी यंत्रणा, स्वत:च्या आजारी आमदारांना अत्यंत नाजूक स्थितीत मतदानास उचलून आणण्यासारखे प्रकार करत असून माणुसकी तुडवून त्यांना स्ट्रेचर व व्हीलचेअरवर मतांसाठी आणले जाते. विजयाची किंवा चमत्काराची इतकीच खात्री असताना हे अमानुष, अघोरी प्रयोग कशासाठी? अशी टीका शिवसेनेने केली आहे.
मलिक-देशमुखांना मतदानाची परवानगी नाही, हे भेदाभेदीचेच राजकारण. पण त्याच वेळेला लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक या दोन आजारी आमदारांना अत्यंत नाजूक स्थितीत मतदानास उचलून आणले जाते.
हे दोन्ही आमदार कर्करोगाशी झुंजत आहेत. व्हेंटिलेटरवर त्यांचा श्वास आहे असे म्हणतात, पण राजकीय स्वार्थ असला की, माणुसकी तुडवून त्यांना स्ट्रेचर व व्हीलचेअरवर मतांसाठी आणले जाते. विजयाची किंवा चमत्काराची इतकीच खात्री असताना हे अमानुष, अघोरी प्रयोग कशासाठी? पण राजकीय फायद्यासाठी भाजपा कोणत्याही अमानुष थरापर्यंत घसरू शकतो. याचेच नाव चमत्कार, असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.
काय म्हणाल्या मुक्ता टिळक
भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, पक्ष आदेशानुसार आपण मतदानासाठी जात आहे. पक्षाने दिलेला आदेश पाळायचा, हे आमच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे.
लक्ष्मण जगतापांचे मत बहुमूल्य
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजप आमदार लक्ष्मण जगतापांचे मत हे बहुमूल्य ठरले होते. आता विधानपरिषदेच्या आखाड्यात ही तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणूनच आजारग्रस्त आमदार जगताप मतदानासाठी मुंबईला आलेत. लक्ष्मण जगताप यांना देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी फोन करून तब्येतीची विचारपूस केली होती.
जगताप यांच्यां बंधूंनी म्हटलं की, राज्यसभेच्या वेळीही पक्षानं स्पष्टपणे सांगितलं होतं की, तब्येत बरोबर नसेल तर येऊ नका. पक्षापेक्षा व्यक्ती आम्हाला महत्वाचा आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. पक्षानं मतदानासाठी आग्रह केला नव्हता, असं ते म्हणाले.