मुंबई : देशात जे काही चालले आहे ते लोकशाहीसाठी पूरक नाही. जे कोणी विरोधात उभे राहतील त्यांच्यावर धाडी टाकल्या जात आहेत. महाराष्ट्रातही असेच दबावाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे सरळ मार्शल लॉ लावून हुकूमशाही जाहीर करा, असा टोला शिनसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. महाराष्ट्रात आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी ईडी आणि सीबीआयचा वापर करतील का अशी भीती वाटत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.
नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना खासदार राऊत म्हणाले, सत्येंद्र जैन हे हिमाचलचे प्रभारी म्हणून तयारी करत होते. त्यांच्यामुळे भाजपला अडचण निर्माण झाली असती त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. जे विरोधात उभे राहतात त्यांच्यावर धाडी टाकल्या जात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रातसुद्धा दबावाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने सरळ मार्शल लॉ लावून हुकूमशाही जाहीर करावी.
आता तर राज्यसभेसाठीही ईडीचा वापर होतोय का काय अशी भीती वाटत आहे. शिवसेना पक्षाचा सहावा उमेदवार महाविकास आघाडीने दिला असून ती जागा आम्हीच जिंकणार असल्याचा दावाही राऊतांनी केला आहे. त्यामुळे भाजपने कितीही घोडे उधळू द्या, आम्हीच जिंकणार आहोत असेही त्यांनी सांगितले.
काँगे्रस पक्षातील नाराजीसंदर्भात ते म्हणाले, छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये बाहेरचे उमेदवार आहेत. काँग्रेसला सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. काँग्रेसने देशाचे नेतृत्व करावे असे आम्हाला वाटते. त्यामुळे भाजपाने हे लक्षात घ्यावे की, राजाला फक्त प्रजा असते समर्थक नाहीत. चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरमध्ये लोकांनी येऊ दिले का? असे म्हणत त्यांनी पाटलांना टोमणा मारला आहे. संभाजीराजे आपण राजकारणात आहात. चढ-उतार येत असतात. ते पचवता आलं पाहिजे. बुद्धिबळाचे पट आमच्याकडेही आहेत. सगळे खेळ आमच्याकडे आहेत, फक्त संगीत खुर्ची नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.