36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeमहाराष्ट्रपॉझिटिव्ह बातमी.....१५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट

पॉझिटिव्ह बातमी…..१५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि. ४(प्रतिनिधी) राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी दैनंदिन वाढ आता कमी होत आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये अजूनही वाढ होत असल्याची माहिती, आरोग्यमंत्री श्री टोपे यांनी आज दिली. लसीकरणाला वेग वाढवण्यासाठी लसींचा पुरवठा वाढणे आवश्यक आहे. आज राज्याला कोविशिल्डचे ९ लाख डोस प्राप्त झाले असून त्याद्वारे ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. तर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे १८ लाख डोसेससाठी खरेदी आदेश देण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील नांदेड, धुळे, मुंबई, भंडारा, ठाणे, नाशिक, लातूर, नंदूरबार, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, रायगड, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गोंदीया या जिल्ह्यांमधील दैनंदिन नवीन रुग्णसंख्या कमी झाली आहे. महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात आत्तापर्यंत ४५ वर्षांवरील सुमारे १ कोटी ६५ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ४५ वर्षांवरील ३.५ कोटी लोकसंख्येपैकी ४५ टक्के नागरिकांना लसीकरण आत्तापर्यंत झाले आहे. मात्र काल केवळ २५ हजार डोस शिल्लक राहिल्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद केले होते. आज राज्याला ९ लाख डोस मिळाले असून त्यातून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाईल, असे टोपे यांनी सांगितले.

१ मेपासून १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणास सुरूवात करण्यात आली. आतापर्यंत या वयोगटातील सुमारे १ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. याला गती येण्यासाठी कोविशिल्ड लसीचे १३ लाख ५८ हजार तर कोवॅक्सिन लसीच्या ४ लाख ८९ हजार असे एकूण १८ लाखांहून अधिक डोसेस खरेदी करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. स्पुटनिक लस भारतात आली असून तिच्या दराबाबत चर्चा सुरू आहे. ते निश्चित झाल्यानंतर त्याचे डोस राज्यात मागविले जातील. तरुणाईने लसीकरणासाठी गर्दी करू नये. पोर्टलवर नोंदणी आणि दिनांक, वेळ निश्चिती नंतरच लस दिली जाईल. त्यामुळे संयम आणि शिस्त पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

राज्य शासनाने रेमडेसीवीर, ऑक्सिजन यासाठी काढलेल्या जागतिक निविदेला कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. मदत व पुर्नवसन विभागाकडून त्याची छाननी आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. या जागतिक निविदेच्या माध्यमातून राज्याला साडेतीन लाख रेमडेसीवीर, २० हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, २७ स्टोरेज टॅंक उपलब्ध होतील. जेणे करून ऑक्सिजनचा बफर साठा करून ठेवता येईल, असे टोपे यांनी सांगितले. सध्या केंद्र शासनाकडून राज्याला दररोज ४० हजाराच्या आसपास रेमडीसीवीर मिळत आहेत. वाढत्या मागणीमुळे ते कमी पडत आहेत. पुरवठा झालेले रेमडेसीवीर जिल्ह्यांच्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात जिल्हाधिकाऱ्यांना वाटप केले जात आहेत.

तसेच राज्यात जिल्हाधिकाऱ्यां मार्फत १५० ऑक्सिजन प्लांट (हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारे) खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यांमध्य ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पासाठी जिल्हा विकास व नियोजन आणि राज्य आपत्ती पुर्नवसन निधी यामधून निधी घेण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाकडून राज्याला जे १० पीएसए प्लांट मंजीर आहेत त्यातील ९ प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.

केंद्राकडून राज्याला आज ९ लाख डोस मिळाले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या