34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeमहाराष्ट्रथकबाकीबाबत निर्णय होईपर्यंत वीज कनेक्शन तोडणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

थकबाकीबाबत निर्णय होईपर्यंत वीज कनेक्शन तोडणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२ (प्रतिनिधी) थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची व घरगुती ग्राहकांची वीज जोडणी तोडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नियम ५७ अन्वये विधानसभेत वाढीव वीजबिलाचा मुद्दा उपस्थित केला. सर्व विषय बाजूला ठेऊन या प्रश्नावर तातडीने चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली.

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले आली आहेत. त्यांच्याकडून वीजबिलांची सक्तीने वसुली केली जात आहे. यात सर्वाधिक शेतकरी भरडला जात आहे. त्याचे वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याने शेतीच्या कामांवरही संकट आले आहे. त्यामुळे तात्काळ या विषयावर चर्चा घडवून आणावी आणि वीज कनेक्शन तोडणे थांबवावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

त्यावर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनीही या विषयावर चर्चा घडवून आणण्याची मागणी केली. तर विधानसभा अध्यक्षांनी हा विषय आधीच सरकारच्या विषय पत्रिकेवर असल्याने त्यावर वेगळी चर्चा करण्याची गरज नाही, असे सांगून या विषयावर वेगळी चर्चा घेण्यास नकार दिला. यामुळे विरोधक आक्रमक झाले होते.
मात्र थकबाकीसंदर्भात उपस्थित मुद्याला उत्तर देताना अजित पवार यांनी वीजबिलांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे.

चर्चा होऊन दोन्ही बाजूंच्या सभासदांचे समाधान होईपर्यंत राज्यातील कृषीपंप आणि ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात येणार नाही. राज्यातील वीजथकबाकीसंदर्भात विशेष बैठक आयोजित करुन चर्चा करण्याचीही सरकारची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्देशाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले व गोंधळ टळला.

कांग्रेसकडून महिलांना दरमहा २ हजार रुपये मिळणार – प्रियांका गांधी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या