27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रसत्ता स्थापनेच्या हालचाली; राज्यपालांना शुक्रवारी पत्र देणार

सत्ता स्थापनेच्या हालचाली; राज्यपालांना शुक्रवारी पत्र देणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारला आव्हान देत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आपल्यासोबत ४१ आमदार दावा करीत उद्या शुक्रवारी आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना पाठवणार असल्याचे ट्विट त्यांनी केले.

दरम्यान, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनाही त्यांनी सर्व आमदारांच्या स्वाक्ष-याचे पत्र पाठविले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे सरकार वाचविण्यासाठी शिवसेनेसोबतच कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नेतेही प्रयत्नशील आहेत. मात्र, खा. संजय राऊत यांनी बंडखोरांना परत येण्याचे आवाहन करून आघाडीतून बाहेर पडायची तयारी दर्शविल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नेते नाराज झाले. परंतु भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्धार केला.

बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेऊन सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केलेली असतानाच इकडे शिवसेना नेत्यांना अजूनही हे आमदार परत येतील, अशी आशा आहे. खा. संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत वेळ आल्यास आम्ही सभागृहात बहुमत सिद्ध करू. शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांपैकी २१ आमदार अजूनही आमच्या संपर्कात आहेत, असे सांगतानाच गुवाहाटीत गेलेल्या सर्वच आमदारांनी परत यावे, शिवसेना आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे, असे म्हटले.

राऊत यांच्या या वक्तव्याने महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत नाराजीचा सूर उमटला. त्यातच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने या पार्श्वभूमीवर तातडीने बैठकाही बोलावल्या. मात्र, या बैठकीत विचार मंथन केल्यानंतर दोन्ही मित्र पक्षांनी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचे विधान केले होते.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रचंड नाराज आहेत. सध्याची परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षच हायजॅक केल्याचं चित्र आहे. कारण शिवसेनेचे सर्वाधिक आमदार आणि खासदारांचा शिंदे यांना पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे शिवसेनेत फूट पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

व्हीडीओ व्हायरल, शिंदे म्हणाले, भाजपचा पाठिंबा
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा नवा व्हीडीओ समोर आला आहे. यामध्ये भाजपचा आपल्याला पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. कुठेही काही लागले तर कमी पडणार नाही, असा शब्द भाजपने आपल्याला दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी त्यात सांगितले. आपण फक्त एकजुटीने राहू. विजय आपलाच आहे, असा विश्वासही त्यांनी बंडखोर आमदारांना दिला. भाजप एक राष्ट्रीय शक्ती आहे.

राष्ट्रीय पक्ष असल्याने बलवान आहे. आपल्याला मदतीचा त्यांनी शब्द दिला आहे.
तुमच्या पाठीमागे आमची पूर्ण शक्ती असल्याचे भाजप नेतृत्वाने आपल्याला सांगितले आहे. त्यामुळे आता आपली एकजूट आवश्यक आहे, असे एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना मार्गदर्शन करताना म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या