27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रसंजय राऊतांना सत्तेचा माज

संजय राऊतांना सत्तेचा माज

एकमत ऑनलाईन

नागपूर : महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडी सरकारला वैतागली असून, त्यांचे आमदारदेखील सरकारमध्ये वैतागले आहेत. महाविकास आघाडीचे आमदार स्वत: म्हणतायेत की, मंत्री आमच्याकडून कमिशन घेतात तर जनतेकडून किती घेत असतील. सत्ता ही लोकांसाठी असते मात्र संजय राऊतांना सत्तेचा माज आला आहे, अशी टीका नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.

राज्यसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर बोंडे आपल्या घरी अमरावतीला जात असताना त्यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या आमदारांना मंत्री भेटत नाहीत, मुख्यमंत्री भेटत नाहीत तर मग जनतेला केव्हा भेटणार? त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला, सर्व महाराष्ट्राची जनता या सरकारला वैतागली आहे. आता जनतेला देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळाची आठवण येत आहे. म्हणून जनता म्हणत आहे की, आता पुन्हा फडणवीसांचे सरकार पाहिजे. त्याचे प्रतीक राज्यसभा निवडणुकीत पाहायला मिळाले.

शिवसेनेला सत्तेचा माज
संजय राऊतांचे बोलणे थांबवले नाही तर संपूर्ण शिवसेना नष्ट होईल. संजय राऊत यांच्याकडे देखील यंत्रणा आहेत. त्यांच्याकडे वृत्तपत्र आहे पण त्यात काही दम नाही. शिवसेनेने नारायण राणे यांना जेलमध्ये पाठवले पण कोर्टाने न्याय देत राणेंना नाकारले. अर्णव गोस्वामीला देखील शिवसेनेने अडकवण्याचा प्रयत्न केला. बदल्याच्या भावनेने शिवसेना प्रत्येक वेळा चुका करते. सत्ता ही लोकांसाठी असते मात्र दुर्दैवाने संजय राऊत आणि शिवसेनेला सत्तेचा माज आला आहे, असे टीकास्त्र बोंडे यांनी केले.

अपक्षांना बदनाम करण्याचा प्रयत्न
राज्यसभेमध्ये जे झाले ते विधान परिषदेतही होणार आहे. संजय राऊतांनी अपक्ष आमदारांचा देखील अपमान केला आहे. अपक्ष आमदार घोडेबाजारामध्ये खपले. त्यांनी पैसे घेतले, असे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा गाढवपणा दुसरा कोणी करणार नाही तो शिवसेना करत असल्याचे देखील बोंडे म्हणाले.

राऊतांनी काळजी करू नये
भारतीय जनता पक्षात प्रत्येकाला न्याय दिला जातो, संजय राऊतांनी स्वत:च्या पक्षाचे पाहावे. शिवबंधन बांधण्यासाठी संभाजीराजेंचा अपमान शिवसेनेनेच केला आहे. संभाजीराजेंना नाकारल्यानंतर एका मावळ्याला आम्ही खासदार बनवतो असे म्हणणारी ही शिवसेना आहे, त्या मावळ्याला पराभूत करून पुन्हा सामान्य माणसाचा अपमान करणारी ही शिवसेना आहे. पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत. त्यांना योग्य सन्मान मिळतो. त्यांची काळजी संजय राऊतांना घेण्याची गरज नाही, असा टोलाही बोंडेंनी लगावला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या