21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeमहाराष्ट्रकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करा, आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करा, आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

एकमत ऑनलाईन

मुंबई दि २४(प्रतिनिधी) कोरोनाची दुसरी लाट अजून गेलेली नाही. त्यातून सावरेपर्यंत आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करावा लागणार आहे. डेल्टा प्लेस या नव्या विषाणूचा देखील धोका वाढत असून, पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील तसेच फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील याबाबत सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आरोग्य विभागाला दिले.

कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या ७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दूरचित्र प्रणालीद्वारे चर्चा केली. दुसऱ्या लाटेचे शेपूट अजून बाकी आहे. आपण पूर्णपणे त्यातून बाहेर आलेलो नाही. तोवर तिसऱ्या लाटेचे संकट येऊ घातले आहे.

जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ( लेव्हल्स) ठरवून दिल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. लेव्हल्सचा आधार घेऊन नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता सर्व व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते. यादृष्टीने आपल्या शहर अथवा जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा आणि घाईघाईने व्यवहार खुले करू नका असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. दुसऱ्या लाटेत आपण ऑक्सिजनच्या कमतरतेचा अनुभव घेतला आहे. आणि म्हणूनच सर्व जिल्ह्यांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा आत्तापासून करून ठेवा. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधी व इतर आवश्यक वैद्यकीय सामुग्री उपलब्ध राहील हे पहा. आपल्याला बऱ्याच ठिकाणी फाईल्स रुग्णालयांसारख्या सुविधा उभारता येतील त्यासाठी इमारती व जागांचे नियोजन करून ठेवा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

७ जिल्ह्यांनी अधिक काळजी घ्यावी
प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी, राज्यातील या ७ जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंतेचा विषय बनू शकते, असा इशारा दिला. या सात जिल्ह्यांपैकी ३ जिल्हे कोकण, ३ पश्चिम महाराष्ट्र आणि एक मराठवाड्यातील आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर चाचणी, तसेच ट्रेसिंग व लसीकरण करण्यावर भर दिला जाईल तसेच या जिल्ह्याना यासंदर्भात आवश्यक त्या सुविधाही पुरविण्यात येतील असे सांगितले. आर चाचणी वाढविणे, वाड्यावस्त्यांमध्ये कंटेनमेंट उपाययोजना अधिक काटेकोरपणे राबविणे याकडे सर्वानीच लक्ष द्यावे अशी सूचना मुख्य सचिवांनी दिल्या.

यावेळी बोलताना टास्क फोर्सचे डॉ संजय ओक आणि डॉ शशांक जोशी यांनी सांगितले कि, या सातही जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. या विषाणूची लक्षणेही बदलत आहेत. लसीकरणाविषयी नागरिकांच्या मनातील भ्रामक कल्पना व समजुती काढून घेऊन त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणे खूप आवश्यक आहे. प्रसंगी अधिक कडक निर्बंधही लावावे लागणार आहे. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली तसेच फिरत्या प्रयोगशाळा पुरविण्याची विनंती केली तसेच गावोगावी कोरोनमुक्तीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

प्रारंभी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी या सातही जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. राज्याचा पॉझिटिव्हिटी दर ०. १५ इतका कमी झाला आहे. मात्र या सात जिल्ह्यांचा दर त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट आहे. रत्नागिरीत पहिल्या लाटेत ३०७४ रुग्ण तर दुसऱ्या लाटेत ५६०० रुग्ण, सिंधुदुर्गात पहिल्या लाटेत १३४६ तर सध्या ५५०० , हिंगोलीत पहिल्या लाटेत ६६० तर दुसऱ्या लाटेत ६७५ रुग्ण आढळले असून ही वाढ सावध करणारी आहे असे ते म्हणाले.

३ हजार मे.टन ऑक्सीजन निर्मितीचे उद्दिष्ट
राज्यात सध्या दरदिवशी१३०० मे.टन ऑक्सीजन निर्मिती होत असून ही निर्मिती ३ हजार मे.टनापर्यंत वाढवण्याच्या उदेशाने शासनाने “ऑक्सीजन स्वावलंबन योजना” हाती घेतली आहे. याअंतर्गत ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या उद्योगांना अनेक प्रोत्साहने देण्यात आली आहेत. याचा लाभ घेऊन ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी त्यांची ऑक्सीजन निर्मिती, तसेच साठवणूक क्षमता येत्या तीन-चार आठवड्यात वाढवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. तसेच याक्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना शासन पूर्ण सहकार्य करील अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील काही मोठया ऑक्सीजन निर्मिती कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला.

यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, तसेच विविध उद्योगांचे प्रतिनिधी ऑल इंडिया इंडस्ट्रीयल गॅस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष साकेत टिकू आदी मान्यवर उपस्थित होते. काही जिल्ह्यात आज ही रुग्णसंख्या कमी होतांना दिसत नाही. त्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचा नवा विषाणु दिसून आला आहे. त्याची घातकता, परिणामकारकता आज आपल्याला माहित नाही. पण संभाव्य धोका लक्षात घेऊन आता आपल्या हातात जो काही वेळ आहे त्या कालावधीत ऑक्सीजन स्वालंबन मिळवणे गरजेचे आहे. आपण अनलॉक प्रक्रियेमध्येही अनेक गोष्टी हळुहळु उघडत आहोत, यामुळे उद्योग क्षेत्रही अडचणीत आहे, याची आपल्याला जाणीव आहे परंतू आज आपले पहिले प्राधान्य हे लोकांचे जीव वाचवण्याला आहे हेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लसीकरणाला वेग
राज्यात गेल्या दोन दिवसात विक्रमी लसीकरण झाले आहे. आपली लसीकरणाची क्षमता दररोज १० लाख लोकांची असली तरी लसींची उपलब्धता मर्यादत आहे. ही बाब लक्षात घेता नवीन विषाणु आणि संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची तयारी आतापासूनच करणे आवश्यक आहे. यात तातडीने आणि दीर्घकालीन स्वरूपात करावयाच्या उपाययोजना हाती घेता येतील असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विशेषत: दुर्गम भागातील ऑक्सीजन साठवणूक पूर्ण क्षमतेने करण्यात यावी असे आवाहन केले. संकटकाळात आपण सर्वांनी साथ दिल्यामुळेच आपण हे आव्हान पेलू शकलो आणि राज्यातील ऑक्सीजन व्यवस्थापन उत्तमपणे हाताळू शकलो असेही ते म्हणाले. असेच सहकार्य भविष्यकाळात द्यावे असे सांगतांना त्यांनी एकमेकांच्या सहकार्यातून महाराष्ट्राला सुरक्षित ठेवत पुढे जाऊ या असेही म्हटले.

पुण्यातील आंबिल ओढ्यातील घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या