अंबाजोगाई : कर्मयोगी डॉ. बाळासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने या वर्षीही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून समाज व राष्ट्र उन्नतीसाठी योगदान देणा-या ११ मान्यवरांना सोमवार, दि. ३० मे रोजी सन्मानित करण्यात आले.
डॉ. बाळासाहेब माणिकराव ठोंबरे यांचे सातवे पुण्यस्मरण आणि त्यानिमित्ताने पुरस्कार वितरण व शेतकरी मेळाव्याचे आयोजन सोमवार, दि. ३० मे रोजी मु. पो. उंदरी (ता. केज, जि. बीड) येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण तर उद्घाटक म्हणून परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. मारोतीराव ढोबळे आणि विचारमंचावर अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर, ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, माजी कुलगुरू मधुकरराव गायकवाड, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सोमनाथ रोडे हे मान्यवर उपस्थित होते.
यावर्षी कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृति पुरस्कारांचे मानकरी दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे (कृषी प्रशासन व आदर्श बंधू भरत पुरस्कार), जयप्रकाश आसाराम दगडे (समाजसेवा पुरस्कार), प्रदिप नणंदकर (कृषि पत्रकारिता पुरस्कार), कविता चंद्रशेखर नेरकर-पवार (महिला सक्षमीकरण व प्रशासन पुरस्कार), मधुकर बळिराम वडोदे (साहित्य व लेखन पुरस्कार), प्रभाकर नारायणराव जावळे (भक्त पुंडलिक पुरस्कार), सोमनाथ हनुमंत माने (कृषि संशोधन पुरस्कार), रशिद गुलाबखाँ पठाण (सद्भावना पुरस्कार), डॉ. भगवानराव कुंडलिकराव ठोंबरे (उंदरी ग्रामभूषण पुरस्कार) तसेच या वेळी स्व. माणिकराव दादासाहेब ठोंबरे पाटील यांच्या स्मृतीनिमित्त रामेश्वर किसनराव मांडगे (कुशल कारभारी किसान पुरस्कार) आणि स्व. सौ. राणीलक्ष्मीबाई दादासाहेब ठोंबरे पाटील यांच्या स्मृतीनिमित्त श्रीमती जतनबाई बालचंदजी सोळंकी (कुशल कारभारीन किसान पुरस्कार) हे ठरले.
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप फेटा, शाल, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पहार व श्रीफळ असे होते. प्रारंभी दीपप्रज्ज्वलन व प्रतिमापूजन करून स्व. माणिकराव ठोंबरे पाटील व डॉ. बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर प्रमुख अतिथींचे स्वागत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कवयित्री सौ. अनुराधा सूर्यवंशी-ठोंबरे यांनी प्रतिष्ठानच्या वतीने मागील काही वर्षांपासून करण्यात येत असलेल्या कार्याचा आढावा घेतला. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार प्रदिप नणंदकर यांनी नेमक्या शब्दांत शासनाची कृषीविषयक धोरणे यावर मार्मिक भाष्य केले.
या कार्यक्रमास आ. सतीशभाऊ चव्हाण, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. धर्मराज गोखले यांनी तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. किशनराव गोरे यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य दिगंबरराव मोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी मानले.
या कार्यक्रमास वनामकृविचे माजी कुलसचिव डॉ.दिगंबरराव चव्हाण, प्राचार्य डॉ. हेमंत पाटील, माजी प्राचार्य डॉ. बाळासाहेब चव्हाण, प्रकाश सोळंकी, अविनाशराव मोरे, प्रा. वसंतराव चव्हाण, मधुकर काचगुंडे यांच्यासह बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, बुलडाणा, पुणे आदी भागातून सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.