पुणे : संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ््यासाठी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू येथे येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, जवळपास २ हजार पोलिस तैनात केले आहेत.
येत्या २० जून रोजी तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. तत्पूर्वी मंगळवारी तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्यानंतर ते वारक-यांना संबोधित करणार असून, त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच मुख्य मंदिर परिसर, सभेचे ठिकाण आदी परिसरात पोलिस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे. त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा देहूत दाखल झाला असून केंद्रीय, तसेच राज्यस्तरीय पथकाकडून सुरक्षेच्या सर्व बाबींची कसून तपासणी करण्यात येत आहे. तसेच देहू गावाच्या वेशीवरदेखील सर्व बाजूंनी येणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. मोदींच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर देहूला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
कडेकोट बंदोबस्त
देहूत बंदोबस्तासाठी १० पोलिस उपायुक्त, २० सहायक पोलिस आयुक्त, २५ पोलिस निरीक्षक, २९५ सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि २ हजार २७० पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत, असे सांगण्यात आले.