23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeमहाराष्ट्रपंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांची दिल्लीत भेट, राज्यात तर्कवितर्कांना उधाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांची दिल्लीत भेट, राज्यात तर्कवितर्कांना उधाण

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१७ (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पंतप्रधानांची भेट घेऊन आपण काही राष्ट्रीय प्रश्नांबाबत चर्चा केल्याचे ट्विट स्वतः पवार यांनी केले आहे. सहकारी बँक कायद्यातील बदल व राज्याच्या अन्य प्रश्नांबाबत चर्चा झाल्याचे स्पष्ट करताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी राजकीय उलथापालथीची शक्यता फेटाळून लावली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही राजकीय तर्क-वितर्क निरर्थक असून कोणी भिंतीवर कितीही डोके आपटले तरी आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागच्या महिन्यात दिल्लीत झालेल्या भेटीनंतर सुरू झालेली चर्चा थांबत नाही तोवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाल्याने पुन्हा राजकारण तापलं आहे. शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधान कार्यालयात सुमारे एक तास भेट झाली. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तास्थापणेचा तिढा निर्माण झसला होता तेव्हा नोव्हेंबर २०१९ मध्ये पवार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. त्यावेळीं स्वतः पंतप्रधानांनी आपल्याला एकत्र सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता असे नंतर पवार यांनीच सांगितले होते. या पार्श्वभूमीवर तब्बल दीड वर्षानंतर या दोघांची भेट होऊन प्रदीर्घ चर्चा झाली. याशिवाय केंद्रीय मंत्री व भाजपचे राज्यसभेतील सभागृह नेते पीयुष गोयल यांनी पवार यांची भेट घेतली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही देवेंद्र फडणवीस हे ही काल दिल्लीत ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून गेले. यामुळे स्वाभाविकच राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

काय झाली चर्चा ?
संसदेचं अधिवेशन सोमवारपासून सुरु होत असून शुक्रवारी सकाळीच शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. दोन दिवसात झालेल्या भेटीगाठी राजकीय नसल्याचा दावा केला जात आहे. नव्या बँकिंग कायद्याचे राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांवर होणारे परिणाम, केंद्राच्या सहकार खात्यामुळे निर्माण झालेला संभ्रम, ओबीसी व मराठा आरक्षणाचा प्रश्न या बरोबरच राष्ट्रवादीच्या नेत्यांमगील ईडी चौकशीचा ससेमिरा या संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

सहकारी बँकांच्या कायद्यात केलेल्या बदलांबाबत चर्चा-नवाब मलिक
मोदी-पवार यांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण आल्याने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या भेटीबद्दल स्पष्टता केली.या भेटीनंतर सुरु झालेल्या चर्चांमध्ये तथ्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची भेट केवळ बँकिंगमधील समस्यांबाबत होती. केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे सहकारी बँकांना मोठं नुकसान होत आहे. रिझर्व्ह बँकेला खूप अधिकार देण्यात आले आहेत. नव्या नियमांमुळे सहकारी बँकांच्या स्वायत्ततेवर गदा आली आहे. याविषयीचे सहविस्तर निवेदनही पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. याविषयी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन मोदींनी शरद पवार यांनी दिलं आहे. नियमांतील बदलांमुळे सहकार बँकांना धोका आहे. याविषयी पंतप्रधानांसोबत फोनवर चर्चा झाली होती. आणि आज त्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व काँग्रेस नेत्यांनाही कल्पना होती, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

सोमवारी संसदेचे अधिवेशन सुरू होत असल्याने केंद्रीय मंत्री व राज्यसभेचे नेते पीयूष गोयल यांनी काल पवारांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. काल शरद पवार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची झालेली भेटही राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित होती. यावेळी काँग्रेस नेते व माजी संरक्षण मंत्री ए के अँटोनी देखील उपस्थित होते. देशाच्या या दोन्ही माजी संरक्षण मंत्र्यांनी या भेटीत देशातील सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित मुद्दे तसेच सीमेवरील सुरक्षेसंदर्भातील मुद्यांवर चर्चा झाल्याचे मलिक यांनी सांगितले.

अफवांचे दळण, सरकार पडणार नाही-संजय राऊत
पंतप्रधान मोदी-शरद पवार भेट पूर्णतः अराजकीय होती. आश्चर्य वाटावं, धक्का वाटावं असं या भेटीत काय आहे ? शरद पवार हे देशाचे माजी संरक्षण, कृषी मंत्री आहेत. त्यांच्याशी महत्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्याची आवश्यकता वाटली असेल. संसदेचा सदस्य पंतप्रधानांना भेटू शकत नाही का? असा सवाल करताना यावरून सुरू झालेले तर्क-वितर्कांचे दळण कितीही दळले तरी जात्यातून काहीही बाहेर पडणार नाही. सरकारवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. भाजपच्या मनात काही वेदना आहेत, दुःख आहे, त्यांनी आमच्याकडे व्यक्त करावं. अशा चर्चा करण्यापेक्षा तीन वर्षे सबुरीचे आहेत ते काढा तुम्ही. भिंतीवर डोकं आपटत राहिला तरी सरकार पडणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

पंढरपूर आणि परिसरात उद्यापासून संचारबंदी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या