उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनानिर्मूलन आढावा बैठकीत निर्णय
पुणे : कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. यंदाच्या वर्षी वारी, दहीहंडी हे उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. राज्य सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अधिवेशनसुद्धा रद्द केले. त्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा. तसेच गणेश विसर्जनाला परवानगी दिल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कमीत कमी ५५ लाख लोक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी देणे शक्य नाही असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनानिर्मूलन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी आपण प्रत्येक उत्सव साधेपणाने साजरा करत प्रशासनाला सहकार्य करत आहोत. तसेच गणेशोत्सव देखील करण्यात यावा. त्याचप्रमाणे गणेश विसर्जनाला परवानगी देणे शक्य नाही.
पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे ही निश्चित समाधानाची बाब आहे.तसेच रुग्णालयांमधील गंभीर रुग्णांवर उपचार करताना त्यांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा पद्धत निश्चितच उपयोगी ठरेल असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
जम्बो रुग्णालय उभारणीचे काम गतीने सुरू
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी क्षेत्रनिहाय कोरोना बाधित रुग्ण, नमुना तपासणी प्रयोगशाळा, आठवडानिहाय कोरोना बाधित रुग्ण व मृत्यूचा तपशील, कोरोनामुक्त झालेले रुग्ण, संपर्क व्यक्ती शोधणे, क्षेत्रनिहाय प्रतिबंधित क्षेत्र, अनुमानित कोरोना रुग्ण व नियोजित बेड उपलब्धता, रुग्णवाहिका उपलब्धता याबाबतची सविस्तर माहिती दिली. तसेच जम्बो रुग्णालय उभारणीचे काम गतीने सुरू असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
शिस्तबद्ध नियोजन
कोरोनाविरुद्ध लढताना या आजाराविषयीची भीती दूर करण्यासोबतच शहरांसह ग्रामीण भागात देखील दक्षता व उपाययोजनांबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन, मृत्युदर आटोक्यात ठेवणे आणि चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर देणे महत्त्वाचे आहे. रुग्णांना वेळेवर उपचार देणे तितकेच गरजेचे आहे. कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्याचा विश्वास व निर्धार देखील पवार यांनी यावेळी बोलून दाखविला.
ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक
कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून, बेड देखील उपलब्ध होत असल्याने महापौरांसह अन्य लोकप्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. परंतु, ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्युदरदेखील वाढला आहे. एमआयडीसी क्षेत्र असलेल्या तालुक्यात ही वाढ खूपच आहे. त्यात अनेक तालुक्यांत आजही गंभीर रुग्णांना उपचार मिळत नाहीत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स बेड्स मिळत नाहीत. पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये, जम्बो हॉस्पिटलमध्ये ग्रामीण भागासाठी स्वतंत्र कोटा निश्चित करा, चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याची मागणी करण्यात आली.
६० खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारणार