प्रशासनाचे सगळे दावे फोल : पत्रकारिता क्षेत्रातून प्रचंड संताप व्यक्त
पुणे: पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन झालं आहे. पांडुरंग हे एका वृत्त वाहिनीचे पुण्याचे प्रतिनिधी होते. गेल्या काही दिवसांपासून पांडुरंग हे सतत फिल्डवर जाऊन रिपोर्टिंग करत होते. त्याचकाळात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. मात्र आज (२ सप्टेंबर) पहाटे साडेपाच वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अहमदनगर जिल्ह्यातून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केलेल्या पांडुरंग यांनी अनेक मोठ्या मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये काम केलं होतं. गेल्या काही वर्षापासून ते पुण्यात वार्तांकन करत होते. दरम्यान, त्यांच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन मुलं आणि पत्नी असा एकूण परिवार आहे.
गेली १५ वर्ष पांडुरंग रायकर हे पत्रकारितेत होते. अनेक वृत्त वाहिन्यांसाठी त्यांनी काम केलं होतं. ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली असल्याने पांडुरंग रायकर यांनी नेहमीच ग्रामीण भागातील प्रश्न आजवर तळमळीने मांडले होते. कृषी क्षेत्रात विशेष रस असलेल्या पांडुरंग यांनी यासंबंधी देखील अनेकदा वार्तांकन केलं होतं. साधारण २ वर्षांपासून ते पुण्यात रिपोर्टिंग करत होते. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. पण काल रात्रीच्या सुमारास त्यांची ऑक्सिजन पातळी अचानक कमी झाल्याने त्यांची प्रकृती प्रचंड ढासळली.
पुण्यातील तरुण पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन झाले.या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.
— Supriya Sule (@supriya_sule) September 2, 2020
व्हेंटिलेटरवर ठेवण्याची आवश्यकता होती
यावेळी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची आवश्यकता होती. मात्र, त्यावेळी पुण्यात कुठेही व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ शकलं नाही. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याची माहिती मिळताच त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न सुरु झाले.
तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली
पण कोव्हिड सेंटर ते रुग्णालय या प्रवसाकरिता त्यांना तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. ज्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यास उशीर झाला. त्यामुळेच पांडुरंग यांना आपल्या प्राणांना मुकावे लागले. पांडुरंग रायकर यांच्या निधनानंतर पत्रकारिता क्षेत्रातून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये आरोग्य सेवेसंबंधी एवढा ढिसाळ कारभार समोर आल्याने आता प्रशासनाचे सगळे दावे फोल असल्याचे दिसून येत आहे.
AstraZeneca ची लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात-डोनाल्ड ट्रम्प