अकोला : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त सांस्कृतिक कार्य विभागा मार्फत, भाषेची विविधता जोपासण्या करिता व कविता, गझल, कव्वाली यांचे सादरीकरण करण्याकरिता अकोला येथे २ दिवसीय कव्वाली व मुशायरा महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली. दिनांक १३ व १४ जून २०२२ रोजी प्रमिलाताई ओक सभागृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केलेले असून त्यामध्ये काव्य, गझल, कव्वाली सोबतच देशभक्तीपर रचनांचा ही समावेश असेल असेही, अमित विलासराव देशमुख यांनी नमूद केले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असून यामध्ये, भारतातील सुप्रसिद्ध कव्वाल व मराठी-हिंदी कवी, गझलकार या महोत्सवात आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या सुफी गायकीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे प्रसिद्ध सुफी गायक हाजी असलम साबरी, दिल्ली भारतातील सुप्रसिद्ध कव्वाल सलीम-जावेद, बँगलोर यांच्या कव्वालीची मेजवानी रसिक प्रेक्षकांना प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार आहे. सोबतच मराठी, हिंदीतील सुप्रसिद्ध कवी-गझलकार यांच्या मुशायरा कार्यक्रमाचा आनंद रसिकांना अनुभवता येणार आहे. सदरील कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य असुन सर्व रसिकांनी या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आवाहन केले आहे.