मुंबई : राज्यात गेल्या २ आठवड्यांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. अशात मुंबई, ठाणे, पालघरमध्ये अनेक भागांत पाणी साचल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अशात कोल्हापूर, मराठवडा, विदर्भ आणि गडचिरोलीत पावसाने पूरपरिस्थिती ओढावली होती. पण आता राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रासह मध्य भारतात सध्याचा पाऊस हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहिल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यातील काही धरणे भरली आहे, तर काही धरण क्षेत्रांत अजूनही मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. अशातच येणा-या काळात पाऊस हा आता हळूहळू ओसरणार आहे, असे अगोदरच हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. दरम्यान, राज्यातील ब-याच भागात पावसाने उसंत घेतलेली पाहायला मिळाली. मुंबईतही आज सकाळपासून पावसाचा जोर ओसरलेला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. मात्र, सकाळपासून मुंबईत पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे.
बरीच धरणे अर्धवटच
पावसाचा आढावा घेतला तर राज्यात आणखी पावसाची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील धरणे अद्याप भरायची आहे. यापुढेही पाऊस चांगला असेल. मात्र, मध्यंतरीच्या काळात पावसाची उघडीप असेल. त्यानंतर पुन्हा चांगल्या पावसाचे संकेत आहेत. राज्यात १५ जुलैपर्यंत सरसरीपेक्षा ३० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.