मुंबई : गुढीपाडव्यापासून राज्यात राज ठाकरेंबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. त्या दिवशी झालेल्या सभेतले राज यांचे भाषण, त्यावर सर्वपक्षीय राजकारण्यांनी केलेल्या टीका-टिप्पण्या आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी राज ठाकरेंनी घेतलेली उत्तरसभा यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. याच सभेदरम्यान त्यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यावरून आपली भूमिका मांडली होती आणि ३ मेचा अल्टिमेटम दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.
येत्या पाच जूनला राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. या दौ-यासाठी बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर खलबते पार पडत आहेत. अयोध्येचा दौरा मोठा करण्यासाठी मनसेच्या वतीने १० ते १२ रेल्वे गाड्या बूक करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी राज ठाकरे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहिणार असल्याचे कळत आहे. या बैठकीसाठी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, गजानन काळे, शिरीष सावंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख नेते राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या मुंबईतल्या निवासस्थानी पोहोचत आहेत.
राज्यातल्या मशिदींवरील भोंगे तीन मेपर्यंत उतरवले गेले पाहिजेत असा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी आपल्या सभेतून राज्य सरकारला दिला होता. याच संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. ३ मे रोजी जर मशिदीवरील भोंगे उतरवले गेले नाहीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असेल? याबद्दल या बैठकीत चर्चा होणार आहे. ११ वाजता ही बैठक राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी होणार असल्याची माहिती हाती येत आहे.