नवी दिल्ली : भाजपकडून राज्यसभेसाठी २ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. माजी मंत्री अनिल बोंडे आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यांमध्ये होणा-या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी नावांची यादी जाहीर केली. यामध्ये मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि हरियाणा या राज्यांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.
मध्य प्रदेशातून कविता पाटीदार यांना, कर्नाटकमधून निर्मला सीतारामन आणि जगेश यांना उमेदवारी देण्यात आली. पियुष गोयल आणि अनिल सुखदेवराव बोंडे यांना महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर झाली. राजस्थानमधून घनश्याम तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली. उत्तर प्रदेशात पक्षाने सुरेंद्रसिंह नागर, बाबुराम निषाद, दर्शना सिंह आणि संगीता यादव यांना उमेदवारी दिलीे.
देशातील १५ राज्यातील ५७ जागांवर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सर्व ५७ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होत आहे. कार्यकाल संपत असलेल्या नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेस नेते जयराम रमेश, कपिल सिब्बल, अंबिका सोनी यांचाही कार्यकाळ संपत आहे. तसेच उत्तर प्रदेशातील ११ राज्यसभा खासदार जुलैमध्ये निवृत्त होत आहेत.
६ व्या जागेसाठी महाडिक मैदानात?
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता कोल्हापूरचे दोन मल्ल झुंजण्याची शक्यता आहे. पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता भाजपच्या तिस-या जागेसाठी आणि एकूणात सहाव्या जागेसाठी कोल्हापूरच्या धनंजय महाडिकांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिक यांच्यात लढत होऊ शकते.