नाशिक : अयोध्येत राममंदिराचे काम वेगाने सुरु आहे. राममंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना कधी होणार आणि राममंदिर कधीपासून भाविकांना दर्शनासाठी खुले होणार याची प्रतीक्षा आहे. याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार असून त्यानंतर राम मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे, अशी माहिती राम जन्मभूमी न्यासचे कोषाध्यक्ष गोव्ािंददेव गिरी महाराज यांनी दिली आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये रामललाची नूतन गर्भगृहात स्थापना करणार आहोत. त्यावेळी पहिला मजला, गर्भगृह होईल, लोकांच्या दर्शनाची व्यवस्था होईल आणि दुसरीकडे मंदिरचे बांधकाम चालू राहील, असेही ते म्हणाले.
अयोध्येचा राम सर्वांचा आहे. कोणालाही वाटते अयोध्येला जावे दर्शन घ्यावे. त्यावर कुणाचा प्रतिबंध असू नये. रामाचा विरोध करणारा रावण जरी असेल आणि त्याने अयोध्येला जाण्याची इच्छा व्यक्त केली तरी कोणी रोखू नये. अयोध्येला जाण्यामागे राजकीय हेतू पेक्षा श्रद्धा असावी,असे मत गोविंदगिरी यांनी व्यक्त केले.
ज्ञानवापीमध्ये जो तपास चालू आहे तो नवीन नाही, याप्रकारचे ऐतिहासिक पुरावे पुष्कळ शतकाच्या आधीच मिळाले होते. पुरातन काळातील नंदी आहे. त्याचे तोंड मशिदीकडे त्यामुळे तिथे शिवल्ािंग मिळणे, इतरही काही मूर्ती मिळणे हे स्वाभाविक आहे, असेही ते म्हणाले.
मुस्लिम समाजातील तरुण, परिपक्व वर्गाला विवाद वाढवू नये, सहमतीने सर्व करावे असे वाटत आहे. मुस्लिम समाज स्वत:हून पुढे येईल. सलोख्याच्या वातावरणात प्रश्न मिटेल. मुस्लिम पक्षकार त्यांचे दावे करतीलच पण वस्तुस्थिती काय आहे हे बघितले पाहिजे, असेही ते म्हणाले.
समान नागरी कायदा नसणे हे रानटीपणाचे लक्षण
समान नागरी कायदा नसणे हे रानटीपणाचे लक्षण आहे. जगातील कुठल्याही देशात असा भेदभाव केला जात नाही, सर्वांकरिता एक कायदा असणे हे नैसर्गिक आहे. सर्वांकरिता एक कायदा असणे यालाच सेक्युलर म्हणता येईल अन्यथा त्या देशाला सेक्युलर म्हणता येणार नाही. , असेही गोविंद गिरी यांनी सांगितले.