मुंबई : ‘राष्ट्र – एक रणभूमी’ हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे.हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. अखेर दोन वर्षांनी या चित्रपटाला मुहूर्त मिळाला आहे.
प्रत्येक चित्रपटाची खासियत हे त्यातले कलाकार असतात. या चित्रपटाचे वैशिष्ट्य काहीसे वेगळे आहे. या चित्रपटातील कलाकार महत्त्वाचे आणि दिग्गज आहेत, शिवाय दोन मोठे राजकारणी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहेत.
ही दोन नावे आहेत रिपाइं नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि शेतक-यांचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी. आपल्याला विश्वास बसणार नाही पण त्या दोन दिग्गजांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. मनामनांत राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा ‘राष्ट्र’ हा चित्रपट २६ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात आजघडीला अतिशय ज्वलंत असणारा आरक्षणाचा महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला आहे. आजच्या प्रगत समाजात आरक्षणाची नेमकी भूमिका काय आहे, याचा उहापोह करण्यासाठी हा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात रामदास आठवले आणि राजू शेट्टी यांच्यासह विक्रम गोखले, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मिलिंद गुणाजी, रीमा लागू, संजय नार्वेकर, गणेश यादव असे मराठीतील आघाडीचे कलाकार आहेत.