नागपूर : मुख्यमंत्र्याचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणासाठी घराबाहेर पडलेले राणा दाम्पत्य अर्थात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा शनिवार दि. २८ मे रोजी ३६ दिवसांनी अमरावतीत परतणार आहेत. मात्र त्यापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा नागपुरात हनुमान चालिसा पठण केले.
दिल्लीहून नागपुरात परतल्यावर राणा दाम्पत्य रामनगर परिसरातील मारुती मंदिरात हनुमान चालिसा पठण केले आहे. पोलिसांनी त्यांना काही अटी-शर्तींसह हनुमान चालिसा पठणाला परवानगी दिली होती. त्याच मंदिरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देखील हनुमान चालिसा पठणाची परवानगी मिळाली असल्याने त्यामुळे राणा समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र तसा प्रकार न घडल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सीआरपीसीच्या कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावली आहे. लाऊडस्पीकरचा वापर करु नये, मंदिरासमोर अवास्तव गर्दी जमवू नये, प्रक्षोभक वक्तव्य करू नये अशा सूचना पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपुरातील पदाधिका-यांना दिल्या आहेत.