28 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home महाराष्ट्र बलात्काराचा आरोप, अनैतिक संबंधामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद धोक्यात !

बलात्काराचा आरोप, अनैतिक संबंधामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद धोक्यात !

भाजपची मागणी, निवडणूक आयोगाकडेही तक्रार; शरद पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१३ (प्रतिनिधी) बलात्काराचे आरोप व एका महिलेबरोबरील संबंधांची स्वतःच दिलेली कबुली यामुळे सामाजिक न्यायमंत्री राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले आहेत. धनंजय मुंडे यांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी करताना राजीनामा न दिल्यास राज्यात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तर भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करून दुसऱ्या लग्नाची व आपत्यांची माहिती लपवणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी फेसबुकद्वारे याबाबत स्पष्टीकरण करताना बलात्काराचा आरोप फेटाळला, परंतु तक्रारदार महिलेच्या बहिणीबरोबर आपले संबंध असून या संबंधातून त्यांना दोन मुले असल्याची कबुली स्वतःच दिली आहे. त्यांनीच कबुली दिल्याने भाजपने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. भाजपा महिला आघाडीने सर्वप्रथम राजीनाम्याची मागणी केली. यानंतर स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली. धनंजय मुंडे यांनी स्वतः राजीनामा न दिल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली. ज्या व्यक्तीवर असे आरोप होतात त्याला त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. मात्र गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील, असे वाटत नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांची मात्र सावध प्रतिक्रिया !
एकीकडे भाजपच्या अन्य नेत्यांनी अत्यंत आक्रमकपणे राजीनाम्याची मागणी लावून धरलेली असताना विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः महिलेबरोबरील संबंधांची कबुली दिली आहे. आपण कोर्टात गेलो असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. नैतिकता महत्वाची आहे. त्यांच्या पक्षानं तातडीनं दखल घ्यावी व चौकशी करून काय बाहेर येतं ते बघावं. आम्ही त्यानंतर पुढची मागणी करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

निवडणूक आयोगाकडे तक्रार !
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करून, धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: कबूल केलं आहे की, त्यांनी दोन लग्न केली आहेत. अनेक मुलं आहेत. तसंच तिसऱ्या महिलेशीही त्यांचे संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पत्नी आणि मुलांच्या नावे प्रॉपर्टी घेण्यासाठी मदत केल्याचेही त्यांनीच कबूल केले आहे. मात्र निवडणूक प्रतिज्ञापत्रात कुठेही या पत्नीचा व मुलांचा उल्लेख केलेला दिसत नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडे या सर्व गोष्टींचा तपास करण्याची मागणी केली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना ऑक्टोबर २०१९मध्ये आपल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या दोन पत्नींची तसेच सर्व मुलांची माहिती आणि त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची माहिती लपवली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी, असं सोमय्या यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

लगेच कुठल्या निष्कर्षाला येणे योग्य नाही -जयंत पाटील
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावू धरल्यानंतर यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्यता न पडताळता लगेच काही तरी निष्कर्ष काढणे अयोग्य असल्याचे सांगत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. राजकारणात उभं राहण्यासाठी, राज्याच्या स्तरावर यायला प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही. धनंजय मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उच्च न्यायालयात देखील यापूर्वीच अर्ज दाखल केलेला आहे. ही न्यायालयीन बाब आहे. कुटुंबातील अंतर्गत बाब आहे. धनंजय मुंडेंनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरही आरोप झाले. या प्रकरणाचा खुलासा झाला. यात काही अर्थ नसल्याचं निष्पन्न झालं. कोणीही आरोप केले म्हणजे अंतिम निष्कर्षला पोहोचणं योग्य नाही. मुंडे यांच्याबाबतही याबाबत‌ चौकशी होईल, खुलासा होईल,असे जयंत पाटील म्हणाले.

अब्दुल सत्तार म्हणतात, प्यार किया तो प्यार किया तो डरना क्या !
या प्रकरणामुळे गोत्यात आलेल्या धनंजय मुंडे यांची शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी उघड पाठराखण केली. प्यार किया तो डरना क्या ? असे म्हणत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपाच्याही अनेक नेत्यांची अशी प्रकरणं असल्याचा आरोप केला.

सीरमची कोरोना लस लातूरात दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या