मुंबई : संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीचा विषय शिवसेनेच्या दृष्टीने संपला, असे ठाम विधान संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेनेच्या एका जागेवर उमेदवारी हवी असेल तर संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी भूमिका पक्षाकडून घेण्यात आली होती. मात्र संभाजीराजेंनी त्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला. त्यामुळे शिवसेनेने कोल्हापुरातल्याच दुस-या नेत्याला उमेदवार म्हणून घोषित केले. त्यावरून आता चर्चा आणि तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याविषयीची प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, आमच्याकडून संभाजीराजेंचा विषय संपला आहे. मराठा संघटना संजय राऊत आणि शिवसेनेला हे महागात पडेल अशा धमक्या देत आहे. पण संजय राऊतांचा या गोष्टींशी व्यक्तिगत संबंध काय? शिवसेनेचा तरी काय संबंध? जे अशा धमक्या देत आहेत, त्यांनी मागच्या काही दिवसांतल्या घडामोडींचा अभ्यास करावा.