नांदेड : एका वृद्ध व्यक्तीला जागेवरील ताब्यासाठी १५ लाख रुपये खंडणी मागल्याप्रकरणी अक्षय रावत त्यांचे सहकारी राजू बिल्डर, अशोक उमरेकर, गुड्डू आणि इतर पाच अशा नऊ लोकांविरुध्द शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दत्तनगर भागात राहणारे सुदाम किशन राउत वय ६२ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. २७ जूनच्या सायंकाळी ५ वाजेच्यासुमारास त्यांच्याकडे अक्षय रावत, राजू बिल्डर, अशोक उमरेकर , गुड्डू व इतर पाच लोक आले. त्यांनी दत्तनगर येथील शटर क्रमांक ७७, भुखंड क्रमांक २६ च्या उत्तरेकडील २०/५० फुटचा भाग ज्यावर दोन शटर आहेत. त्या जागेवरील ताब्याबाबत १५ लाख रुपये खंडणी मागितली.
तुला या शटरचा ताबा कोणी दिला. असे विचारून शिवीगाळ केली व त्यांच्यासोबत आलेल्या इतर चार ते पाच लोकांनी शटरला लाथा घालून गोंधळ केलाÞ यानंतर शटरला लावलेले लॉक तोडून त्यांचे लॉक लावून निघून गेले. शिवाजीनगर पोलीसांनी या तक्रारीनुसार भारतीय दंड संहितेच्या कलम ३८४, ३८५, १४३, १४७, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर हे करणार आहेत.