बीड : राज्याच्या माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेची उमेदवारी नाकारून भाजप श्रेष्ठींनी त्यांच्या पतंगाचे दोर पुन्हा एकदा कापून धक्का दिला, तर भाजप समर्थक शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचाही पत्ता कट केला आहे. राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले माजी आमदार अमरसिंह पंडित यांचीही घोर निराशा झाली आहे. एकंदरीत, विधान परिषदेसाठी सर्वच पक्षांनी बीड जिल्ह्याला डावलले आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी दुपारी प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे उमेदवारीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. यावेळी भाजपच्या नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळेल अशी शक्यता होती. परंतु याहीवेळी मुंडे त्यांना डावलले गेले. या धक्क्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादेत पक्ष कार्यालयात राडा केला.
बीडमधून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांना राजकीय पुनर्वसनाची अपेक्षा आहे. याआधीही राज्यसभेसाठी त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यांना संधी देण्यात आली नाही. परळीत गोपीनाथ गडावर ३ मे रोजी भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत झालेल्या संघर्ष दिन कार्यक्रमात मुंडे या आक्रमकपणे सहभागी झालेल्या दिसल्या.
मात्र मुंबईतील ओबीसी मोर्चा व औरंगाबादेतील जल आक्रोश मोर्चाला त्यांची गैरहजेरी ठळकपणे दिसून आली. या उलट त्यांना भाजपचे राष्ट्रीय सचिवपद दिल्याने राष्ट्रीय राजकारणात त्या सक्रिय दिसत होत्या. यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही समर्थन दिले होते. तरीही त्यांना उमेदवारी नाकारली गेली. यामुळे सध्या तरी त्यांना भाजपसाठी राष्ट्रीय स्तरावर काम करावे लागणार, हे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसकडून बीडला खासदारकी
काँग्रेस पक्षाने पाच महिन्यांपूर्वी रजनी पाटील यांना राज्यसभेची खासदारकी दिली. लोकसभेच्या माध्यमातून भाजपच्या खा. प्रीतम मुंडे तर काँग्रेसकडून राज्यसभेच्या खासदार रजनी पाटील या बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी काँग्रेसने रजनी पाटील यांना खासदारकी बहाल केली.
मेटेंचा पत्ता कट- दरम्यान, शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचीही विधान परिषदेवरील मुदत संपली होती. मागील वेळी त्यांंना भाजपनेच विधान परिषदेवर संधी दिली होती. यामुळे त्यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यांनीही तशी मोर्चेबांधणी केली. परंतु त्यांचाही भाजपने पत्ता कट केला. यामुळे मेटे समर्थकांतही भाजपविषयी नाराजीचा सूर उमटत आहे.
राष्ट्रवादीकडूनही निराशा- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला विधान परिषदेत दोन जागा आहेत. गेवराईचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे पुनर्वसन होईल, अशी अपेक्षा होती. त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी, अशी मागणीही समर्थकांनी केली होती. परंतु त्यांचाही राष्ट्रवादीकडून अपेक्षाभंग झाला.