30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home महाराष्ट्र पुनर्वसन धोरण लवकरच आणणार : विजय वडेट्टीवार

पुनर्वसन धोरण लवकरच आणणार : विजय वडेट्टीवार

एकमत ऑनलाईन

जालना : पुनर्वसित गावांचे असलेले प्रश्न कायमचे निकाली निघावेत यासाठी पुनर्वसन धोरण लवकरच आणणार असल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. इतर मागास बहुजन कल्याण विभाग, आपत्ती व्यवस्थापन व मुदत व पुनर्वसन विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थित अधिका-यांना मार्गदर्शन करताना वडेट्टीवार बोलत होते.

मंत्री वडेट्टीवार म्हणाले, गेली अनेक वर्षे पुनर्वसन धोरण नसल्याने पुनर्वसित गावांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. पुनर्वसित गावांचे असलेले प्रश्न कायमचे निकाली निघावेत, या दृष्टिकोनातून पुनर्वसन धोरण तयार करण्यात आले असून या धोरणास मंजुरी मिळण्यासाठी येत्या आठवडाभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवण्यात येणार आहे. जमीन खरेदीपासून ते गावांच्या सर्व नागरी सुविधांपर्यंतचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्यात येणार असल्याने पुनर्वसित गावांचे प्रश्न कायमचे निकाली निघणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतपिकाच्या नुकसानभरपाईसाठी १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले होते. त्यापैकी ५२२ कोटी रुपयांचा सर्वाधिक निधी जालना जिल्ह्यासाठी देण्यात आला होता. या निधीपैकी ४६० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून उर्वरित निधीही नुकसानग्रस्तांना तातडीने वितरित करण्याचे निर्देशही मंत्री वडेट्टीवार यांनी जिल्हा प्रशासनाला यावेळी दिले.

कोरोना महामारीच्या काळामध्ये जालना जिल्ह्यात जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने अत्यंत उत्कृष्टपणे परिस्थिती हाताळली. याबद्दल प्रशासनातील सर्व अधिकारी व आरोग्य सेवेतील प्रत्येकाचे कौतुक केले. कोरोना आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून जिल्ह्याला साडेबारा कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी अतिरिक्त निधी लागल्यास तसा प्रस्ताव सादर करण्यात यावा, तो उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कोविड -१९, पुनर्वसन विभाग, पशुसंवर्धन, नुकसानभरपाई आदींबाबत पॉवर पॉईंटच्या माध्यमातून माहिती दिली. यावेळी आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

ओबीसी समाजाचे आम्ही पहारेकरी
जागते रहो..एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात बारा बलुतेदारांच्या जाती असताना ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पहारेकरी उभे आहोत, ओबीसी समाजात घुसू पाहणा-यांना हा इशारा आहे, असे वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. गायकवाड समिती ही मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाची समिती होती. मात्र या समितीवर मागासवर्गीयच नव्हते हाच खरा मुद्दा आहे. तरी देखील एसीबीसीतून मराठा समाजाला आरक्षण घेण्यासाठी कुणाचाही विरोध नाही. परंतु काही विघ्नसंतोषी त्याला वेगळे वळण देण्यासाठी काम करत आहेत असेही ते म्हणाले. विजय वडेट्टीवार यांनी जालन्यात रविवारी सकाळी ओबीसी मोर्चात सहभाग नोंदवला. त्यावेळी ते बोलत होते.

घुसखोर हीच काँग्रेसची व्होटबँक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या