मुंबई : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. स्वस्त खाद्यपदार्थांमुळे मे २०२२ मध्ये किरकोळ महागाई कमी झाली आहे. मे महिन्यात किरकोळ महागाई दर ७.०४ टक्क्यांवर होता, तर एप्रिलमध्ये ७.७९ टक्के होता. आरबीआयचे पतधोरण आणि सरकारे इंधनाच्या दरामध्ये केलेली कपात याचा परिणाम महागाई दर नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो आहे असं जाणकारांचे मत आहे.
नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई दर ७.७९ टक्के होता. गेल्या वर्षी मे महिन्यात किरकोळ महागाई ६.३ टक्के होती. एप्रिलमधील ८.३१ टक्क्यांच्या तुलनेत मे महिन्यात अन्नधान्य महागाई दर ७.७९ टक्के होता.
आरबीआयचा अंदाज, २०२२-२३ मध्ये किरकोळ महागाई ६.७%
या महिन्यात पतधोरण आढाव्यात, रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातील महागाईचा अंदाज ५.७ टक्क्यांवरून ६.७ टक्क्यांवर नेला आहे. चलनविषयक धोरणाचा विचार करताना केंद्रीय बँक प्रामुख्याने किरकोळ चलनवाढीचा विचार केला होता.